खेळाडूंना मिळणार्‍या ग्रेस गुण स्पर्धेत सहभागाच्या अटीत बदल

आठवी, नववी व अकरावीतील सहभाग धरणार
खेळाडूंना मिळणार्‍या ग्रेस गुण स्पर्धेत सहभागाच्या अटीत बदल

अहमदनगर (प्रतिनिधी) - खेळाडूंना दहावी व बारावीला ग्रेस गुणांची सवलत दिली जाते. करोनामुळे 2020-21 साली क्रीडा स्पर्धांना ब्रेक लागले. या गुणांसदर्भात पाठपुरावा केल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने खेळाडूंना मिळणार्‍या ग्रेस गुण स्पर्धेत सहभागाच्या अटीत बदलकेला आहे. आता आठवी, नववी आणि अकरावीतील स्पर्धेतील सहभागानुसार ग्रेस गुण खेळांडूना देण्यात येणार आहेत.

20 डिसेंबर 2018 च्या शासन निर्णया प्रमाणे 6 वी ते 10 वी किंवा 6 वी ते 12 वी पर्यंत कधीही प्राविण्य सहभाग असल्यास खेळाडूंना ग्रेसगुण दिले जातात. दहावी-बारावीत असताना स्पर्धेत सहभागाची अट मात्र शासनाने घातलेली आहे. पण करोनामुळे चालू वर्षात स्पर्धा होऊ न शकल्याने ग्रेस गुण मिळण्यासाठी शासन निर्णयातील दहावी-बारावीत असतानाची सहभागाची अट शिथील व्हावी, म्हणून क्रीडा संघटनेच्यावतीने अनेक वेळा शिक्षण मंत्री, शिक्षण संचलनालय, क्रीडा संचलनालय, राज्य शिक्षण मंडळ यांच्याकडे तसेच शिक्षक व पदवीधर आमदार यांचेमार्फत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. अखेर चार-पाच महिन्यांनंतर शालेय शिक्षण विभागाने दि. 28 मे रोजी कक्ष अधिकारी विवेक सपकाळ यांच्या स्वाक्षरीने सवलतीचे गुण देण्या संदर्भात परीपत्रक निर्गमित केल्याने राज्यातील लाखो खेळाडूंना ग्रेस गुण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

क्रीडा विभागातर्फे आधीच प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आता नवीन शासन परिपत्रकान्वये नव्याने प्रस्ताव सादर करताना शिक्षक व विद्यार्थ्यांनी शासन नियमांचे पालन करत प्रस्तावासाठी लागणारे कागदपत्रे जमा करून ठेवावे. बोर्डाकडून व क्रीडा संचलनालयाकडून मिळणार्‍या सूचनेप्रमाणे व दिलेल्या मुदतीत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, समन्वय समिती अध्यक्ष विश्‍वनाथ पाटोळे, ज्ञानेश काळे, खजिनदार संजय पाटील, महासंघाचे उपाध्यक्ष आनंद पवार, बालभारती अभ्यास मंडळाचे सदस्य राजेंद्र पवार, घनःशाम सानप यांनी केले आहे.

6 वी ते 10 वी/12 वी वाल्यांना गुण मिळणार

शासन निर्णयाप्रमाणे 6 वी ते 10 वी किंवा 6 वी ते 12 वी पर्यंत कधीही सहभाग असल्यास खेळाडूस जिल्हा प्राविण्य 5 गुण, विभाग प्राविण्य 10 गुण, राज्य प्राविण्य 12/15 गुण, राष्ट्रीय प्राविण्य 20 गुण तर आंतरराष्ट्रीय प्राविण्यास सवलतीचे 25 गुण दिले जातात. यावर्षी स्पर्धा न झाल्याने शासनाने दहावी-बारावीतील सहभागाऐवजी 28 मे च्या पत्रान्वये 8 वी, 9 वी व 11 वीतील सहभाग गृहीत धरून खेळाडूंना सवलतीचे गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे मागील शासन निर्णया प्रमाणेच गुण मिळणार असून सहभागाच्या अटीमध्ये शिथीलतेऐवजी बदल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.