भुयारी मार्गाचे काम अपूर्ण असताना चांगदेवनगर रेल्वे फाटक बंद

भुयारी मार्गाचे काम अपूर्ण असताना चांगदेवनगर रेल्वे फाटक बंद

पुणतांबा |वार्ताहर| Puntamba

चांगदेवनगर येथील रेल्वे फाटक भुयारी पूल होण्याच्या अगोदरच बंद करण्यात आल्यामुळे चांगदेवनगरच्या ग्रामस्थांची ससेहोलपट होत असून रेल्वे खात्याने कोणतीही पूर्वसूचना न देता रेल्वे फाटक बंद केल्याने शेतकरी, ग्रामस्थांची अडचण निर्माण झाली आहे.

चांगदेवनगर येथे भुयारी पुलाचे काम सुरू असून येथील रेल्वे गेट रेल्वे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता बंद केल्यामुळे शेतकरी, ग्रामस्थांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. भुयारी पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच फाटक बंद करणे आवश्यक होते. मात्र भुयारी पुलाचे काम अपूर्ण असताना रेल्वेने फाटक बंद करून शेतकरी ग्रामस्थांना त्रास देण्याचा हेतू आहे काय अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

त्यामुळे शेतकर्‍यांना ग्रामस्थांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत असून फाटक बंद केल्याने पूर्वेकडच्या भागातील शेतकर्‍यांची येण्या-जाण्याचा मार्ग बंद झाला. त्यामुळे पाच किलोमीटर अंतरावरून हेलपाटे मारावे लागत आहेत. शेतकरी, वयोवृद्ध, लहान मुले व परिसरातील नागरिकांना फाटक बंदचा फटका बसला आहे. जळगाव परिसरातील गावचा संपर्क यामुळे तुटला असून वाहतूक व्यवस्था बंद झाली आहे.

पर्यायाने ग्रामस्थांना पाच किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागत आहे. रेल्वेच्या अधिकार्‍यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता फाटक बंद करून नागरिकांना मनःस्ताप दिला आहे. यावर ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेतले पाहिजे. रेल्वेच्या कारभाराबाबत तिव्र नाराजी व्यक्त करून या प्रश्नाबाबत पुणतांबा प्रवासी संघटना रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com