
पुणतांबा |वार्ताहर| Puntamba
येथील चांगदेव शुगर मिल्स या खासगी क्षेत्रातील साखर कारखान्याच्या मालकीच्या असलेल्या कामगार व अधिकारी वर्गाच्या निवासासाठी बांधलेल्या 40 पेक्षा जास्त खोल्या अखेर जेसीपीच्या साहाय्याने पाडण्यात आल्या आहेत.
1943 च्या दरम्यान स्थापन झालेल्या चांगदेव शुगर मिल्स या खासगी क्षेत्रातील साखर कारखान्यातील कामगारांच्या निवासासाठी 1972 दरम्यान या खोल्या बांधण्यात आल्या होत्या. या वसाहतीला प्रेमनगर या टोपण नावाने ओळखले जात होते. कारखाना चालू असताना कारखान्याचे तात्कालिक कार्यालय अधिक्षक बाबुजी सक्सेना यांनी या वसाहतीत कामगारांनी आनंदाने व प्रेमाने राहावे, असे आवाहन केले होते. त्यामुळे त्या काळात ही वसाहत प्रेमनगर नावाने ओळखली जात होती. मात्र 1980 च्या दरम्यान राजेश खन्नाचा प्रेमनगर हा चित्रपट खूपच हिट झाला होता. त्यावरूनही काही जणांनी वसाहतीचे स्वयंघोषित प्रेमनगर असे नाव ठेवले होते. मात्र हे नाव आदराने ठेवले होते.
1980 पर्यंत चांगदेव कारखान्यामुळे परिसर अत्यंत वैभवशाली व सुजलाम सुफलाम होता. कारखान्यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे 1100 पेक्षा जास्त लोकांना रोजगार उपलब्धध होता. पाटपाणी कमी झाल्यामुळे व इतर काही कारणामुळे 1984 मध्ये हा कारखाना बंद पडला. 1996-97 मध्ये कारखान्याचा परवाना व यंत्रसामुग्रीची सांगली जिल्ह्यातील निनाई देवी साखर कारखान्यास विक्री करण्यात आली. कारखान्याची विक्री झाल्यामुळे अनेक कामगार बेकार झाले. त्यामुळे 95 टक्के कामगारांनी स्थलांतर केले. त्यामुळे अधिकारी व कामगारांसाठी बांधलेली बहुताशी निवासस्थाने बंद होती.
कारखान्याची मालमत्ता खासगी उद्योजकाची असल्यामुळे कारखान्याच्या 95 एकर जागेत नेमके काय करावयाचे तसेच कामगाराच्या वसाहतीबाबत काय निर्णय घ्यावयाचा ही बाब मालकाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे अत्यंत भक्कम व सिमेंट क्राँक्रिटमध्ये बांधलेल्या या खोल्या का पाडल्या याबाबत काहीही ठोस माहिती कुणीही दिलेली नाही. कारण हा कारखान्याच्या मालकाचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र खोल्या पाडल्याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
कारखाना चालू असल्यामुळे त्या वैभवशाली काळात ज्यांचे चांगदेवनगर पुणतांबा येथे शिक्षण झाले, ज्यांनी बालपण तसेच वयाची अनेक वर्षे येथे गुण्यागोविंदाने घालविली त्यांना मात्र या घटनेमुळी जुन्या स्मृतींची आठवण झाली. सध्या चांगदेव कारखान्यात ज्यांचे वडील सेवेत होते. त्यांची मुले, मुंबई, पुणे, औरगाबाद, नगर, नाशिक तसेच काही जण उत्तराखंड, बिहार, दिल्ली, सुरत येथे मोठ्या हुद्यावर काम करीत असून तेथेच स्थायिक आहेत. त्यांनी मात्र प्रेमनगर वसाहत जमीन दोस्त झाल्याबद्दल खंत व्यक्त केली.