चांगदेवनगर रेल्वे चौकीजवळ भुयारी पुलाचे काम सुरू

चांगदेवनगर रेल्वे चौकीजवळ भुयारी पुलाचे काम सुरू

पुणतांबा |वार्ताहर| puntamba

पुणतांबा रेल्वे जंक्शनपासून अडीच किलोमीटर लांब असलेल्या चांगदेवनगर चौकीजवळ दोन दिवसांपासून भुयारी पुलाचे काम सुरू

झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

दौंड-मनमाड रेल्वे मार्गावर रेल्वे खात्याच्या धोरणात्मक निर्णयानुसार प्रत्येक रेल्वे फाटकाच्या जवळ भुयारी पुलाची कामे हाती घेण्यात आली असून अनेक ठिकाणी ही कामे पूर्ण झाली आहेत. मात्र चांगदेवनगर चौकी तसेच पुणतांबा येथील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी होणारी भुयारी पुलाची कामे मार्गी लागत नसल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती.

कारण दौंड-मनमाड व पुणतांबा-शिर्डी या रेल्वे मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्यामुळे रेल्वे फाटक बंद राहण्याचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे पुणतांबामार्गे कोपरगाव, शिर्डी, वैजापूर, श्रीरामपूर, राहाता या शहरांकडे जाणारा प्रवासी वर्ग त्रस्त झाला होता. अखेर चांगदेवनगर चौकीजवळ भुयारी मार्गासाठी खोदाईचे काम वेगाने सुरू झाले आहे.

या भुयारी पुलासाठी 7ु8 मिटर आकाराचे सिमेंटचे ब्लॉक एक महिन्यापूर्वीच रेल्वे मार्गाच्या पूर्व व पश्चिम दिशेला तयार होऊन पडलेले आहेत. बलॉक बसविण्यासाठी दोन अजस्त्र क्रेन घटनास्थळी दाखल झाल्या असून पोकलेन मशिनमार्फत मुरुमाची खोदाई सुरू असून डंपरच्या सहाय्याने खोदलेला मुरूम रेल्वेच्या हद्दीत जळगावकडे जाणार्‍या रस्त्यालगत टाकला जात आहे. काम नियोजनानुसार लवकर पूर्ण करण्याचा मानस ठेकेदाराच्या प्रतिनिधीने व्यक्त केला आहे.

चांगदेवनगर येथील भुयारी पुलाचे काम पूर्ण झाल्यावर पुणतांबा येथील पुलाचे काम सुरू केले जाणार आहे. नियोजित भुयारी पूल सध्याच्या रेल्वे फाटकाच्या ठिकाणी केला जाणार असल्याचे समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com