चांद्रयान 3 मोहिमेत ब्राम्हणीचा भूमीपुत्र प्रशांत हारेलचा सहभाग

चांद्रयान 3 मोहिमेत ब्राम्हणीचा भूमीपुत्र प्रशांत हारेलचा सहभाग

उंबरे |वार्ताहर| Umbare

शुक्रवारी अवकाशात झेपावलेल्या चांद्रयान 3 प्रक्षेपण मोहिमेत राहुरी तालुक्यातील ब्राम्हणीचे भूमिपुत्र प्रशांत गोविंद हारेल सहभागी असल्याने ही राहुरीकरांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.

प्रशांत हे केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या ठिकाणी वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक म्हणून सेवेत आहेत. 10 वर्षापासून पत्नी प्रियंका व दोन मुलांसह तिरुअनंतपुरम येथे स्थायिक आहेत. प्रशांत यांचे चुलत भाऊ, पुतणे ब्राम्हणीत व राहुरीत स्थायिक आहेत. परिवारातील सदस्यांनी शुक्रवारी सायंकाळी त्यांना फोन करून अभिनंदन केले. दरम्यान सोशल मीडियावर त्यांचे खुप कौतुक झाले.

प्रशांत यांचे वडिल गोविंद हारेल सैन्य दलात होते. सेवापूर्तीनंतर त्यांनी पाटबंधारे विभागात काम केले. वडिलांच्या नोकरी दरम्यान प्रशांत यांचे प्राथमिक शिक्षण पारनेर तालुक्यातील जवळा तर शिरूर येथे माध्यमिक शिक्षण झाले. त्यांनी राहुरीतील स्व. रामदास धुमाळ महाविद्यालयात बी.एस्सी केले. त्यानंतर एम.एस्सी पूर्ण करत मुंबईत औषधे तयार करणार्‍या खासगी कंपनीत संशोधन सहाय्यक म्हणून काम केले. पुढे केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम येथे 2013 पासून ते सेवेत रुजू झाले. यापूर्वी चांद्रयान 2, मंगळयान, 1032 सॅटॅलाइट अशा एक ना अनेक यशस्वी मोहीम त्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या. ब्राह्मणी गावासह राहुरी तालुक्यातून प्रशांत हारेल यांचे कौतुक होत आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com