आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना दाखवून देऊ

चंद्रशेखर घुले यांचा कार्यकर्ता मेळाव्यात निर्धार
आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधकांना दाखवून देऊ

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

मी शांत आहे तो पर्यंत ठीक आहे, मात्र ठरवल तर त्याचा कार्यक्रम करत असतो. हा माझा स्वभाव आहे. शेवगावात येऊन भांडणे लावायची, जनतेला भावनात्मक करून, जातीयवाद करून मते मिळवायची व आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हा विद्यमान लोकप्रतिनिधी यांचा धंदा आहे. परंतु विद्यमान लोकप्रतिनिधींना आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव करून दाखवून देऊ असा निर्धार करत कार्यकर्त्यांनी उघड भूमिका घेत आगामी संघर्षासाठी सज्ज राहावे असे आवाहन माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी केले.

अहमदनगर जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील यांना राष्ट्रवादीत फूट पडून एक मताने पराभव पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर तातडीने घेण्यात आलेल्या या मेळाव्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. शेवगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित राष्ट्रवादी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात चंद्रशेखर घुले बोलत होते. या मेळाव्यात ते जिल्हा बँकेत झालेल्या घडामोडींवर भाष्य करतील अशी उपस्थिताना अपेक्षा होती, परंतु त्यांनी ते टाळले मात्र विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

यावेळी माजी आमदार डॉ. नरेंद्र घुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रताप ढाकणे, माजी आमदार पांडुरंग अभंग, संदिप वर्पे, कपिल पवार, अरुणपाटील लांडे, दिलीपराव लांडे, संजय कोळगे, रामनाथ राजपुरे, राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ताठे, गणेश गव्हाणे, संजय फडके, बाळासाहेब जगताप, मन्सूर भाई फारोकी, काशिनाथ नवले, बंडू बोरुडे, राजेंद्र दौंड, मयूर वैद्य, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास नेमाने आदी प्रमुख उपस्थित होते.

यावेळी चंद्रशेखर घुले म्हणाले की, गेल्या सात आठ वर्षात विकास कामांचा निव्वळ भुलभुलय्या दाखवून लोकप्रतिनिधींनी काय दिवे लावले आहेत. याचा पर्दाफाश आपण तालुक्यात संघर्ष यात्रा काढून गावोगावी करणार आहोत. शेवगाव नगरपरीषदेची अवस्था अत्यंत वाईट आहे. शहराला 15 दिवसातून एकदा पाणी येते. शेवगाव बसस्थानक, रस्त्यांची दुरावस्था, पाणी योजना, याबाबत लोकप्रतिनिधींची आपण यापुढे पोलखोल करणार आहोत. आपण फार निवडणुका पाहिल्या स्व.मारुतराव घुले पाटील कुटुंबाने खा. शरद पवार यांना कायम साथ दिलेली आहे ती आजही कायम आहे.

यावेळी पांडुरंग अभंग, काकासाहेब नरवडे, शिवशंकर राजळे, बाळासाहेब ताठे, संजय फडके, ताहेर पटेल, मयूर वैदय, बद्रिनाथ बर्गे, मिलींद गायकवाड, कमलेश लांडगे आदींचे भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी तर सुत्रसंचालन दिपक कुसळकर यांनी केले. तर भाऊराव भोंगळे यांनी आभार मानले.

बँकेतील पक्षीय राजकारण घातक

शेवगाव पाथर्डीतील घुलेंची ताकद परिवर्तनाच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्याला दाखवून देण्याची वेळ आली आहे. जिल्हा बँकेतील भाऊंच्या पराभवामुळे तीन तालुक्यासह जिल्हयाचे व बँकेचे अधिक नुकसान झाले आहे. जिल्हयाची कामधेनु असलेल्या सहकारी बँकेत आता सुरु झाले पक्षीय राजकारण घातक असल्याचे यावेळी क्षितीज घुले म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com