
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
तालुक्यातील चांदेकसारे येथील पानमळा परिसरात राहणारे शेतकरी रवींद्र होन यांची गाभण शेळी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली. शेतकरी जागे असल्यामुळे बिबट्या पळून गेला.
गेल्या काही महिन्यापासून कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव, जेऊर कुंभारी, मुर्शतपुर आदी गावांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त काही होईना, असा संताप नागरिकांमधून व्यक्त होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक पाळीव जनावरे शेळ्या बकर्या लहान लहान वासरे मृत्युमुखी पडून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.
या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. देर्डे कोर्हाळे येथील घटना ताजी असताना बिबट्याने आता आपला मोर्चा चांदेकसारे परिसरात वळवला असल्याचे दिसते आहे. दि 9 मार्च रोजी रात्री 10 वाजता चांदेकसारे येथील पानमळा परिसरातील शेतकरी रवींद्र आप्पासाहेब होन यांची गाभण शेळी किंमत अंदाजे रुपये 10 हजार बिबट्याने हल्ला केल्यामुळे मृत झाली. शेतकरी जागे असल्यामुळे बिबट्या पळून गेला. वनविभागाचे अधिकारी वनरक्षक डी. एन. जाधव हे पंचनामा करण्यासाठी येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
वाड्या वस्त्यांवर बिबट्यांचा अशा प्रकारे प्राण्यांवर होणारा हल्ला आता गावात भर वस्तीवर व्हायला लागला ही अतिशय चिंतेची बाब असून वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त वेळीच करणे गरजेचे असल्याचे मत येथील सरपंच किरण होन व उपसरपंच सचिन होन यांनी व्यक्त केले आहे.