चांदेकसारेचे आरोग्य उपकेंद्र मोजतेय अखेरची घटका

दवाखानाच झाला आजारी
चांदेकसारेचे आरोग्य उपकेंद्र मोजतेय अखेरची घटका

कान्हेगाव |वार्ताहर| Kanhegav

तालुक्यातील चांदेकसारे येथील आरोग्य उपकेंद्राची इमारत पाडून दोन वर्षे झाली तरीही पाडलेल्या अर्धवट इमारतीतच दवाखाना सुरू आहे.

त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. लवकरात लवकर उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी सुनील होन यांनी केली आहे.

पोहेगाव आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे चांदेकसारे उपकेंद्र आहे. गावाच्या बाहेर भैरवनाथ मंदिराशेजारी उपकेंद्राची इमारत आहे. चांदेकसारे गावातून समृध्दी महामार्ग जात असल्याने उपकेंद्राची इमारत बाधित झालेली आहे. गावची लोकसंख्या 7000 च्या वर असून आजुबाजुच्या वाड्या वस्ती वरून रुग्ण येत असतात. समृध्दी महामार्गात उपकेंद्राची इमारत अर्धी बाधित होत असल्याने अर्धी इमारत पाडलेली आहे व एकच खोली शिल्लक आहे. यामुळे निवासी डॉक्टर येथे मुक्कामी थांबत नाहीत.

रात्रीच्या वेळी जर कोनी आजारी पडले किंवा एखादी महिला बाळंतपणासाठी अडली तर तिला कोणताही आधार नाही. तसेच इमारतीची अवस्था ही अक्षरशः भग्नावस्थेत आहे .त्यामुळे या इमारतीच्या परिसरात अवैध धंदे करणार्‍या लोकांचा वावर जास्तच वाढत असल्याचे दिसून येत आहे. उपचार मिळत नाही त्यामुळे गायत्री कंपनीचे हजारो कर्मचारी व चांदेकसारे परिसरात ऊस तोडणी कामगार आलेले असून त्यांना जर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली तर त्यांनी कुठे जायचे हा मोठा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे.

तसेच उपकेंद्राच्या परिसरात गायत्री कंपनीची अवजड वाहने सध्या उभे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे याठिकाणी आरोग्य उपकेंद्र आहे की नाही असे दिसते. चांदेकसारे उपकेंद्रासाठी एक निवासी डॉक्टर व परिचारिका असावी. तब्बल दोन वर्ष इमारत पाडून झाले तरीही प्रशासन याची दखल घेताना दिसत नाही. करोना संसर्गाच्या काळात रुग्णांचे खूप हाल झाले.

उपकेंद्रातील डॉक्टर, नर्स, आशा सेविका यांनी जिवाची पर्वा न करता रुग्ण वाढ होऊ दिली नाही. त्या अनुषंगाने आ. आशुतोष काळे मित्र मंडळ यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पीपीई किटचे वाटपही करण्यात आले होते. पंरतु आज महाराष्ट्रात करोनाचा दुसरा टप्पा सुरू होत असल्याचे दिसून येते आहे. त्याकरिता लवकरात लवकर उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी संबंधित यंत्रणेनेे उपकेंद्राची नविन जागा लवकर निश्चित करून इमारत बांधकाम करावे, अशी मागणी सागर होन यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com