चंदनापुरीत तरुणाचा निर्घृण खून

चंदनापुरीत तरुणाचा निर्घृण खून

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर (प्रतिनिधी)- तालुक्यातील चंदनापुरी येथे अज्ञात इसमाने अज्ञात कारणातून जावळे वस्तीनजीक असलेल्या एका पंक्चर दुकान चालकाचा निर्घृण खून केल्याची घडना घडली आहे. काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास हा प्रकार समोर आला. अब्दुल मोहम्मद युनुस कादीर (वय 27, रा. मोहमद युनुस कादीलपूर, महुआ, जिल्हा वैशाली, राज्य बिहार) असे मयत झालेल्या व्यक्तिचे आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील चंदनापुरी शिवारातील जावळे वस्तीनजीक मयत अब्दुल मोहम्मद युनुस कादीर यांचे पंक्चरचे दुकान आहे. काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास त्या परिसरात राहणार्‍या एका व्यक्तिला दुकानचालक आपल्या दुकानातच अस्ताव्यस्त पडल्याचे दिसल्याने त्याने थोडे पुढे जाऊन त्याला आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्याचा संशय बळावल्याने त्याने याबाबत चंदनापुरीचे पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे यांना फोन करुन माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच पोलीस पाटील घटनास्थळी आले, त्यांनी सदर दुकानात जावून पाहणी केली असता पंक्चर दुकानदार कादीर हा मयत असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी लागलीच तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक पांडूरंग पवार यांना याबाबत माहिती कळविली.

काही वेळातच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्या दुकानात जाऊन पाहणी केली असता मयत कादीर याच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूने रक्त येत असल्याचे व त्या लगतच रक्ताने माखलेली लोखंडी टामी व एक सुरा आढळून आला. सोबतच दुकानाच्या बाजूच्या पत्र्यावरही रक्ताचे डाग आढळल्याने प्रथमदर्शनी मयताचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. घटनास्थळाचा पंचनामा करुन पोलिसांनी मयताचे शव विच्छेदनासाठी रवाना केले.घटनेची माहिती समजल्यानंतर श्रीरामपूर उपविभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, संगमनेरचे उपअधीक्षक राहुल मदने, गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी धाव घेतली.

काल सकाळी घारगावातील एटीएम फोडीच्या प्रकरणी श्वान पथक व ठसे तज्ज्ञाचे पथकही संगमनेरात असल्याने त्यांनाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. यावेळी मयताची ओळख पटविली असता मयताचे नाव अब्दुल मोहम्मद युनूस कादीर (वय 27, रा. महुआ, जि. वैशाली, राजय बिहार) असे असल्याचे समोर आले. पोलीस तपासातून सदर व्यक्तिचा अज्ञात इसमाने खून केल्याचेही स्पष्ट झाले.

याबाबत पोलीस पाटील ज्ञानदेव रहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर 41/2022 भारतीय दंड संहिता 302 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com