
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
तालुक्यातील चंदनापुरी येथे अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करताना महसूल पथकाने जेसीबीसह डंपर पकडला आहे. ही कारवाई तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रविवारी सायंकाळी केली असून एकूण 30 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
चंदनापुरी शिवारातील जावळे वस्ती येथील बांदूचा ओढा येथे अवैधरित्या जेसीबीच्या माध्यमातून गौणखनिजाचे उत्खनन होत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार धीरज मांजरे यांना मिळाली. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी सायंकाळी नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांच्यासह तलाठी पोमल तोरणे, संतोष लंके, बाजीराव गडदे, संदीप शेलार, चालक रवी थोरात या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. सदर घटनास्थळी अवैधरित्या जेसीबीच्या माध्यमातून माती मिश्रीत वाळूचे उत्खनन होत असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले.
त्यामुळे महसूल पथकाने लगेच जेसीबीसह डंपर ताब्यात घेतला असून ही सर्व वाहने संगमनेर येथील पोलीस वसाहतीत आणून लावण्यात आलेली आहेत. सदर वाहने आर. एम. कातोरे व खर्डे पाटील यांची असल्याचे समजते. या कारवाईमुळे अवैध गौणखनिजाचे उत्खनन करणार्यांचे चांगेलच धाबे दणाणले आहेत. काही दिवसांपासून महसूल व पोलीस अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करताना तालुक्यात ठिकठिकाणी वाहने पकडून कारवाई करत आहेत मात्र तरीही गौणखनिजाचे अवैधरित्या उत्खनन करणार्यांना काही फरक पडत नसल्याचे दिसून येत आहे.
संबंधित जेसीबीसह डंपर मालक यांच्यावरती दंडात्मक कारवाई करून सुमारे दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो. यापुढे तालुक्यात अवैधरित्या गौणखनिजाचे कोणीही उत्खनन करू नये तसेच ज्या भागात उत्खनन होत असेल तर त्या भागातून तक्रार आल्यास आम्ही तात्काळ महसूल पथक पाठवून कारवाई करणार आहे. त्यामुळे इथून पुढे कोणी अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही.
धीरज मांजरे, तहसीलदार, संगमनेर.