
चांदा |वार्ताहर| Chanda
नेवासा (Newasa) तालुक्यातील चांदा-रस्तापूर रोडवरील (Chanda Rastapur Road) रस्तापूर शिवारात विधाटे वस्तीवर भरदिवसा चोरट्यांनी बंद घराचे कुलुप तोडून (Burglary) रोख रक्कम व दागिने मिळून जवळपास सव्वालाखाचा ऐवज लंपास केला (Money and Jewelry Theft) आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे चांदा, रस्तापूर परीसरात मोठी खळबळ उडाली असून भरदिवसा घडणार्या चोरीच्या घटनेने शेतातील कामे कशी करावी अशी चिंता वाडी वस्तीवर राहणार्या शेतकर्यांना पडली आहे.
दादासाहेब बापू विधाटे हे पत्नी लताबाई यांच्यासह रस्तापूर शिवारातील शेतात वस्ती करून राहतात. त्यांची शिंगवेतुकाई येथे ही शेती आहे. सोमवार (दि. 10) रोजी विधाटे पती पत्नी सकाळीच घराला कुलूप लावून शिंगवे तुकाई येथील आपल्या शेतात गेले होते. तेथील शेतीकाम आटोपून सायंकाळी 6:30 च्या सुमारास रस्तापूर (Rastapur) येथील घरी आले तेव्हा त्यांना घराचे दार उघडे दिसले तर दाराला लावलेले कुलुपही खाली पडलेले होते. घाबरलेल्या स्थितीत त्यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील सामानाची उचकापाचक झालेली दिसली. तर कपाटातील सामान अस्तव्यस्त पडलेले होते. त्यातील रोख रक्कम दागदागिने दिसेनात.
दादासाहेब यांनी तातडीने त्यांचे भाऊ अरूण विधाटे, मराठा महासंघाचे राजेंद्र शेटे, किरण गायकवाड यांना सदर घटनेची माहिती दिली त्यांनी मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराव दहातोंडे यांना सांगितले. त्यांनी शनिशिंगणापूर पोलिस स्टेशनचे (Shanishingnapur Police Station) सपोनि रामचंद्र कर्पे यांना सदर घटनेची माहिती दिली. सपोनि कर्पे तातडीने फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल होत परिस्थितीची पाहणी केली. त्यानुसार नगरचे श्वानपथक, ठसे तज्ञ यांनाही पाचारण करण्यात आले.
रात्री उशिरा शनिशिंगणापूर पोलिसात दादासाहेब विधाटे यांनी फिर्याद दाखल केली असून त्यात तीन तोळ्याचे मिनी गंठण, मन्याची चैन, सात ग्रॅमचे दोन सोन्याचे झुंबर, अर्धा ग्रॅमची अंगठी, दोन ओम, सहा ग्रॅमचे सोन्याचे दोन बेल व रोख रक्कम पन्नास हजार असे अंदाजे एक लाख चोविस हजाराची चोरी झाल्याची फिर्याद दिली असून त्यानुसार शनिशिंगणापूर पोलिसात भारतीय दंड सहिता 1860 कलम 454/380 नुसार गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला असून पुढील तपास सपोनि रामचंद्र कर्पे करत आहेत. मात्र भरदिवसा (Burglary) झालेल्या या घटनेने परीसरात खळबळ उडाली असून सदर घटनेचा तातडीने तपास लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.