दररोजच्या रिमझिम पावसाने चांदा परिसरात पिकांवर तणांची शिरजोरी

मजुरांची टंचाई || महागड्या औषधांची फवारणी || पिके जगवताना शेतकरी मेटाकुटीला
दररोजच्या रिमझिम पावसाने चांदा परिसरात पिकांवर तणांची शिरजोरी

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरात सध्या मान्सून मेहेरबान झाला आहे. या भागात रोजच येणार्‍या रिमझीम पावसाने बळीराजा चांगलाच हवालदिल झाला आहे. पिकांत गवताने सरशी केली तर मजुराची टंचाई झाली. त्यात मजुरीचे भावही वाढल्याने खरिपात पीक जगवताना बळीराजा मेटाकुटीला आला आहे.

चांदा परिसरात मान्सून यंदा जूनपासूनच बरसला. त्यामुळे बळीराजा सुखावला. यंदा लई बरकत होईल या आशेने खरीप पिकाची जोरदार पेरणी अन् लागवड झाली. परिसरात जूनमध्ये तीन-चार पाऊस जोरदार झाले. शेतातून खळखळा पाणीही वाहिले. त्यामुळे खरिपाची जवळपास 85% पेरणी पूर्णही झाली मात्र जुलै उजाडल्यापासून चांदा, बर्‍हाणपूर, म्हाळसपिंपळगाव, रस्तापूर, कौठा, महालक्ष्मी हिवरा, माका, देडगाव आदी भागात गेल्या आठवडाभरापासून रोजच रिमझीम पाऊस पडत आहे.

गत आठवड्यात तर रोजच पाऊस होता. दोन दिवस उघडीप झाली खरी; परंतु कालपासून पुन्हा रिपरीप सुरू झाल्याने चिंता वाढली आहे. सततच्या पावसाने पिकांमध्ये गवत वाढले आहे. पांढरे सोने असलेली कपाशी गवतात झाकून गेली असून सोयाबीन पिवळे झाले आहे. सर्वत्र गवतच जास्त झाले मात्र त्याच्या खुरपणीसाठी आता मजूरही मिळेनासे झाले आहे. जास्त मागणी असल्याने मजुरीचे भावही वाढले आहेत.

सात-आठ दिवसांत सूर्यदर्शनच झाले नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. अशीच अवस्था फळपिकांचीही झाली आहे.

या भागात मोठ्या प्रमाणावर डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत. बहुतांशी सर्वच जणांनी आंबेबहार धरला आहे. मात्र डाळिंबालाही सूर्यदर्शन नसल्याने बुरशीजन्य रोगाने पछाडले आहे. भरपावसात उत्पादक शेतकरी रोजच महागड्या औषधांची फवारणी करत आहेत. खतांच्या किमती गगनाला भिडल्याने खत खरेदीसाठी बळीराजा कर्जबाजारी झाला आहे. त्यातच अनेक भागात मुख्य खतांबरोबर इतर खतेही नाईलाजास्तव खरेदी करावी लागत आहेत.

उन्हाळी कांद्याला भाव नसल्याने अजूनही तो भुसार्‍यात पडून आहे. तर आता खरिपाला खिशात दमडी नसल्याने अनेकांनी मिळेल तो भाव घेत कांदा विक्री सुरू केली मात्र त्यातून कांद्याचा खर्चही निघेना अशी अवस्था शेतकर्‍यांची झाली आहे. रोजच्या पावसाने गोपालकांचेही खूप हाल होत आहेत. आपल्या जनावरांना चारा असूनही घालता येईना, अशी अवस्था झाली असून त्यामुळे दूध उत्पादनात घट झाली आहे. सततच्या पावसाने छोटी मुले, वृद्ध आजारी झाले असून दवाखाने फुल्ल झाली आहेत. सध्या पीक, जनावरं, माणसं सर्वच जण लख्ख सूर्यप्रकाशाच्या प्रतिक्षेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com