चांद्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार तर तीन गंभीर जखमी

बिबट्याच्या बंदोबस्ताबाबत वनविभागाच्या दुर्लक्षामुळे परिसरात संताप
चांद्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार तर तीन गंभीर जखमी

चांदा |वार्ताहर| Chanda

नेवासा तालुक्यातील चांदा आणि परीसरात बिबट्यांचा हैदोस सुरूच असून शनिवारी एका शेळीचा फडशा पाडल्यानंतर रविवारी एकाच शेतकर्‍याच्या तब्बल सात शेळ्यांवर हल्ला चढवला. चार शेळ्यांना फस्त करून तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. यामुळे चांदा परिसरात घबराट पसरली असून वनविभागाकडून बिबट्याच्या बंदोबस्ताकडे होत असलेल्या दुर्लक्षामुळे संताप व्यक्त होत आहे.

चांदा-मिरी रोडवरील गहिनीनाथ मंदिराजवळ गट नं. 402 मध्ये नानासाहेब काशिनाथ ढवळे यांची वस्ती आहे. त्यांचा शेतीबरोबरच शेळीपालन व्यवसाय आहे. शेळ्यासाठी चोहोबाजूंनी जाळीचे कंपाऊंड आहे. मात्र पहाटे चार वाजेच्या सुमारास या कंपाउंड वरून बिबट्याने उडी मारून शेडमध्ये प्रवेश केला. शेडमध्ये असलेल्या शेळ्यांवर हल्ला करत त्यातील चार शेळ्यांचा जागेवरच फडशा पाडला. तर तीन शेळ्या गंभीर जखमी झाल्पा आहेत.

शेळ्यांचा आरडाओरडा ऐकू आल्याने श्री. ढवळे यांचा मुलगा शरद घराबाहेर आला. त्यांनी आपल्या वडिलांनाही आवाज दिला. दोघांनी कंपाउंड चे गेट उघडून आत मध्ये प्रवेश केला असता त्यांना कंपाउंडच्या एका कोपर्‍यामध्ये बिबट्या बसल्याचे लक्षात आले. घाबरलेल्या अवस्थेत दोघेही जाळीच्या बाहेर आल्यानंतर जोराने आरडाओरड करत फटाके वाजवले. आरडाओरड व फटाक्यांच्या आवाजाने बिबट्याने तेथून पलायन केले.

नंतर श्री. ढवळे यांनी आत मध्ये जाऊन पाहिले असता चार शेळ्या मृत झालेल्या होत्या. त्यामध्ये एक बोकड व तीन गाभण शेळ्या होत्या. तर तीन शेळ्या गंभीर अवस्थेत तडफडत असल्याचे त्यांचे निदर्शनास आले.

त्यांनी तातडीने पोलीस पाटील कैलास अभिनव, पोलीस मित्र सचिन म्हस्के, पत्रकार अरुण सोनकर यांना कल्पना दिली. त्यांनी सदर घटना नेवासा वनविभागाचे श्री. सय्यद यांना सांगितली. त्यानुसार त्यांनी श्री. ढेरे यांना घटनास्थळी पाठवले. त्यांनी सदर घटनेचा पंचनामा केला. मृत शेळयांपैकी दोन गाभण तर एक नुकतीच व्यायलेली होती. जखमी शेळ्यांची प्रकृतीही गंभीर आहे.

दोन दिवसापूर्वी चांदा - म्हाळसपिंपळगाव रोडवर एका शेळीचा बिबटयाने फडशा पाडला होता. पुन्हा एकाच शेतकर्‍यांच्या तब्बल केल्याने शेतकर्‍याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

चांदा परिसरात बिबट्याचे पाळीव जनावरांवर रोजच हल्ले होत असून वनविभागाने या परिसरात अजुनही पिंजरा लावला नसल्याने ग्रामस्थात मोठा असंतोष आहे. निदान आता तरी सदर घटना गांभिर्याने घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी चांदा व परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com