
चांदा |वार्ताहर| Chanda
नेवासा तालुक्यातील चांदा आणि परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून गेल्या आठवड्यात दोन शेळ्यांचा फडशा पाडल्यानंतर शुक्रवारी रात्री पुन्हा एक शेळी बिबट्याने फस्त केल्याने घबराट पसरली असून बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी चांदा परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.
चांदा - म्हाळसपिंपळगाव रोडवरील गट नंबर 963 मध्ये विठ्ठल तुकाराम दहातोंडे यांची वस्ती आहे. पहाटे तीनच्या सुमारास या वस्तीवर बिबट्या आला. जाळीच्या कंपाउंड मध्ये बांधलेल्या शेळ्यांवर त्याने कंपाउंड मधून उडी घेवून हल्ला करून एक गाभण शेळी फस्त केली. सदर घटना श्री दहातोंडे यांच्या सकाळी लक्षात आल्यानंतर त्यांनी गावातील पोलीस मित्र सचिन म्हस्के यांच्याशी संपर्क केला. त्यांनी वनविभागाचे अधिकारी श्री सय्यद यांच्याशी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली.
दुपारी वनविभागाचे श्री. ढेरे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. मात्र गत आठवड्यात याच परिसरात एक शेळी व एक बोकड बिबट्याने फस्त केले होते . त्यानंतर पाच ते सहा दिवस उलटत नाही तोच शेळी फस्त केली. एक मादी व दोन बछडे असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून या बिबट्यांचा तातडीने बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.