अन्नसुरक्षा व पर्यावरण रक्षणासाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उपयुक्त

कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांचे प्रतिपादन
अन्नसुरक्षा व पर्यावरण रक्षणासाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उपयुक्त

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

शेतीमध्ये वापरली जाणार्‍या भरमसाठ रासायनीक खते तसेच औषधांमुळे पाणी, जमीन तसेच हवा या नैसर्गिक संसाधनांचा र्‍हास होत आहे. पर्यायाने हवामानातील बदलाचा परिणाम शेतीवर होत आहे. त्यामुळे भविष्यात अन्न सुरक्षेचा प्रश्न येऊ शकतो. अन्न सुरक्षेसाठी व पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचे मॉडेल उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.

भारतीय एकात्मिक शेती संस्था, मोदीपुरम व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वित एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्प यांचे संयुक्त विद्यमाने एकात्मिक शेती या विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळेचे आयोजन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे दि. 18 ते 21 जानेवारी या कालावधीमध्ये करण्यात आले असून या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते.

या कार्यक्रमासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. एस. भास्कर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर मोदीपूरम येथील भारतीय शेती पध्दती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. ए. एस. पनवार, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, कृषी विद्या विभाग प्रमुख डॉ. आनंद सोळंके, प्रकल्प समन्वयक डॉ. रवी शंकर व एकात्मिक शेती पध्दतीचे प्रमुख कृषी विद्यावेत्ता डॉ. उल्हास सुर्वे उपस्थित होते.

कुलगुरु डॉ. पाटील म्हणाले की विद्यापीठाने विकसीत केलेले आयओटी, सेन्सर तसेच ड्रोन हे तंत्रज्ञान जर एकात्मिक शेती पध्दतीच्या मॉडेलमध्ये वापरले तर अल्पभूधारक तसेच मध्यम शेतकरी सुध्दा शाश्वत उत्पन्न मिळवू शकेल. तसेच यामध्ये विपणन व्यवस्थेचा आंतर्भाव करावा. यावेळी डॉ. भास्कर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले संयुक्त राष्ट्राने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल शेतकर्‍यांसाठी शाश्वत आधार ठरू शकतील असे म्हटले आहे.

एकात्मिक शेती पध्दतीच्या विविध मॉडेल्समधून आपल्याला फक्त कार्बोहायड्रेट्स व उर्जा मिळणार नसून पोषण सुरक्षा देणारे ठरणार आहे. रसायनविरहित शेती व पर्यावरणाची सुरक्षा एकात्मिक शेती पध्दतीचे मॉडेल आत्मसात केले तरच होऊ शकेल. भारतातील 10 हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांपैकी जवळ जवळ पाचशे शेतकरी उत्पादक कंपन्या ह्या नैसर्गिक शेती हा मुख्य घटक स्वीकारुन काम करीत आहेत. हे खुप आशादायक चित्र असल्याचे ते यावेळी म्हणाले.

यावेळी डॉ. पनवार यांनी भारतातील एकात्मिक शेती पद्धतीच्या विविध केंद्रांच्या संशोधनाचा आढावा सादर केला. डॉ. सुनील गोरंटीवार यांनी एकात्मिक शेती पध्दती ही बर्‍याच प्रश्नांवरील मार्ग असल्याचे सांगितले. डॉ. आनंद सोळंके यांनी एकात्मिक शेती पध्दती प्रकल्पाचा आढावा सादर केला.

याप्रसंगी कृषी विद्या विभागातील आचार्य पदवीचा विद्यार्थी काशिनाथ तेली यांचा कृषि वैज्ञानीक परीक्षेतील यशाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विविध प्रकाशनांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यशाळेमध्ये विविध पीक पध्दती, सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेती या विषयावर बुध्दीमंथन करण्यात येणार आहे. सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई व सायली बिरादार यांनी केले तर आभार डॉ. उल्हास सुर्वे यांनी मानले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com