बाळ बोठेकडून स्टँडिंग वॉरंटला आव्हान

जरे हत्याकांड : दाखल अर्जावर मांडले म्हणणे
बाळ बोठेकडून स्टँडिंग वॉरंटला आव्हान

अहमदनगर (प्रतिनिधी) -

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडात पसार असलेला मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने पोलिसांच्या स्टँडिंग वॉरंट

अर्जाला आव्हान दिले आहे. पारनेर न्यायालयात पोलिसांनी दाखल केलेल्या स्टँडिंग वॉरंटविरोधात बोठे याच्यावतीने अ‍ॅड. संकेत ठाणगे यांनी अर्ज दाखल केला. त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी उमा बोराडे यांच्यासमोर मंगळवारी अ‍ॅड. ठाणगे यांनी युक्तिवाद केला.

अ‍ॅड. ठाणगे युक्तिवाद करताना म्हणाले, बोठे याचा जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यानंतर अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात

31 डिसेंबरला अर्ज दाखल केला आहे. रेखा जरे हत्याकांडातील तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी न्यायालयात स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज केला आहे. गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. तशी कायद्यात तरतूद आहे आणि अधिकार देखील आहेत. त्यानुसार बोठे अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करत आहेत. खंडपीठात अटकपूर्व जामीन अर्जावर निर्णय व्हायचा आहे. त्या अगोदर पोलिसांनी स्टँडिंग वॉरंटसाठी अर्ज दाखल केला आहे. एकप्रकारे बोठेला पोलिसांकडून टार्गेट केले जात आहे. पोलिसांना बोठेला जामीन मिळवून द्यायचा नाही, असेच यातून दिसते आहे. बोठे अटक टाळत नसून, अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि तो त्याला अधिकार आहे. असा युक्तिवाद करत अ‍ॅड. ठाणगे यांनी इतर खटल्यातील दाखले न्यायालयासमोर सादर केले. स्टँडिग वॉरंटवर आज (बुधवार) निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयाकडे आता लक्ष लागले आहे.

रेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात 30 नोव्हेंबरला हत्या झाली. या हत्याकांडात आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. या हत्याचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे असल्याचा संशय आहे. पोलिसांच्या तपासात तसे तांत्रिक पुरावे पुढे आले आहे. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर आहे. गेल्या महिन्यांभरापासून बोठेचा या गुन्ह्यात पोलीस शोध घेत आहे. बोठेच्या शोधात आतापर्यंत जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात 45 ठिकाणांपेक्षा जास्त ठिकाणी छापे घातले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com