ओ 22 टक्के...तुमचा विचार काय?

नो लस, नो एन्ट्री लागू करण्याचे प्रशासनापुढे आव्हान
ओ 22 टक्के...तुमचा विचार काय?

अहमदनगर (प्रतिनिधी)

काही महिन्यांपूर्वी लसीकरण केंद्रांवर रांगा लागल्या होत्या, तेव्हा करोना प्रतिबंधक लस शिल्लक नव्हती. मात्र दोन महिन्यांपासून नागरिक करोनाबद्दल एवढे निर्धास्त झाले की लसही घेण्यास तयार नाहीत. जिल्ह्यात अद्याप 22 टक्के पात्र नागरिकांनी पहिली लसच घेतलेली नाही. दुसरी लस न घेणार्‍यांची संख्याही 56 टक्के आहे.

पुन्हा एकदा ओमिक्रॉनमुळे संकट घोंगावत आहे. करोना काळात सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागला. सध्या लस असूनही लस घेण्याकडे दुर्लक्ष करणार्‍यांना ‘तुमचा विचार काय?’ असे विचारण्याची वेळ आली आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 36 लाख 3 हजार 600 जण लसीसाठी पात्र आहेत. त्यापैकी कालअखेर 28 लाख 17 हजार 981 जणांनी लस घेतली आहे. यापैकी 15 लाख 96 हजार 131 जणांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे.

जिल्ह्यातील ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण शुक्रवारी श्रीरामपूरमध्ये सापडल्यानंतर जिल्हा प्रशासन सतर्क झाले. कालच सायंकाळी निर्बंधांची नवी नियमावलीही जाहीर झाली. त्यात नो लस, नो एन्ट्री या नियमामुळे लस न घेतलेल्या अनेकांनी सकाळपासून लस केंद्रांकडे धाव घेतली होती. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करण्याच्या नागरिकांची सवय मोडून त्यांना नियमांच्या चौकटीत बसविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

जिल्हा प्रशासनाने सरकारी कार्यालय, खासगी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी प्रवेशासाठी लसीचा किमान एक डोसची सक्ती केली आहे. शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नो व्हॅक्सीन नो एन्ट्रीचे आदेश काढले. हे आदेश शनिवारपासून लागू झाले. जिल्ह्यात दररोज किमान 40 ते 70 नव्याने करोना बाधित रुग्ण आढळत आहेत. ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटचा प्रार्दुभाव हा अतिशय वेगाने होत असून या पार्श्वभूमीवर नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे सर्व टास्क फोर्स, तसेच आरोग्य विषयक तज्ज्ञांकडून सुचित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com