चेनस्नेचिंग करणार्‍या महिलांचा तरुणांनी सिनेस्टाईल घेतला समाचार

अर्ध्या तासानंतर पोलिसांची झाली एन्ट्री
चेनस्नेचिंग करणार्‍या महिलांचा तरुणांनी सिनेस्टाईल घेतला समाचार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील मेनरोडवर, हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशननजीक एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून नेत असलेल्या महिलांना काही तरुणांनी पाहिले. या तरुणांनी चोरी करणार्‍या महिलांना हटकले असता त्या महिला पळून जाऊ लागल्या. मात्र तरुणांनी त्या महिलांना सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले व चांगलाच चोप दिला. हा थरार जवळपास अर्धा तास चालू होता. मात्र पोलीस या घटनेच्या ठिकाणी फिरकेना; मात्र अर्ध्या तासानंतर पोलिसांनी त्या महिलांना ताब्यात घेतले.

काल दुपारच्यावेळी काही चेनस्नेचिंग करणार्‍या महिला मेनरोडवरून जाणार्‍या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण चोरून नेत असताना मेनरोडवरील काही तरुणांनी पाहिले. ज्या महिलेचे गंठण चोरले ती महिलाही जोरजोराने ओरडू लागली. त्याठिकाणी एकच गर्दी झाली. सोन्याचे गंठण चोरून महिला पळून जात असताना काही तरुणांनी त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना पकडले व त्या ठिकाणी त्यांचा चांगलाच समाचार घेतला.

यावेळी पाहणार्‍यांची गर्दी जमली. हा कल्लोळचा आवाज शिवाजी चौकापर्यंत जाईल, असा होता. मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनला याची भणकही लागली नाही. अर्धा तास चालू असलेल्या नाट्यानंतर पोलिसांनी एन्ट्री केली. त्यांनी त्या महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आलेली नव्हती.

Related Stories

No stories found.