चार जबरी गुन्ह्यातील तीन सोनसाखळी चोर जेरबंद

साडेसहा तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 5 लाख 85 हजारांचा मुद्देमाल हस्तगत || श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई
चार जबरी गुन्ह्यातील तीन सोनसाखळी चोर जेरबंद

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

काल श्रीरामपूर शहर पोलिसांनी चार जबरी गुन्ह्यातील तीन सोनसाखळी चोरांना ताब्यात घेतले असून पोलिसांनी त्यांच्याकडून साडेसहा तोळे सोन्याचे दागिने तसेच तीन चोरीच्या मोटारसायकली असा एकूण 5 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

बेलापूर रोडवरील अनमोल रसवंती याठिकाणाहून रामदास भाऊसाहेब खंडागळे, रा. एकलहरे, ता. श्रीरामपूर हे त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकलवर पत्नीसह घरी जात असताना, त्यांचे पाठीमागून मोटरसायकलवरून येणारे तीन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करून, फिर्यादीस तु आम्हाला शिवीगाळ केली असे म्हणून गाडी अडवून, फिर्यादी व फिर्यादीची पत्नी यांना मारहाण केली व फिर्यादीची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल व फिर्यादीच्या पत्नीचे गळ्यातील 3 ग्रॅम वजनाचे मनी मंगळसूत्र चोरून नेले.

याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर जिल्हा अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच पोलीस पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले असता, यातील एक इसम मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव विचारले असता अक्षय सुरेश कुलथे रा. राहुरी असे सांगितले त्यास दाखल गुन्ह्यात अटक करून तपास केला असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार विशाल ऊर्फ गणेश बाळासाहेब शेटे व दीपक रामनाथ पवार रा. राहुरी यांच्यासोबत केल्याचे कबुल केले.

पोलीस पथकाने तपासाची चक्रे फिरवीत लागलीच पसार आरोपींचा शोध घेतला असता ते श्रीरामपूरमध्ये चोरीच्या मोटारसायकलवर येणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्याने सापळा लावून, पाठलाग करत त्यांना शिताफीने पकडले असता, त्यांच्या ताब्यात गुन्ह्यातील चोरीस गेलेली मोटारसायकल मिळून आली. नंतर आरोपींना पोलीस कस्टडी रिमांडमध्ये दाखल गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी तीन जबरी चोरी स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

आरोपी अक्षय सुरेश कुलथे (रा. राहुरी) हा राहुरी पोस्टे गु.र.नं.286/2020 वि. कलम 302 या गुन्ह्यातून जामिनावर मुक्त झाल्यानंतर वरीलप्रमाणे गुन्हे केलेले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे करीत आहेत.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर जिल्हा अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे, पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक प्रशांत बारसे, पोलीस नाईक वैभव अडागळे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस नाईक सोमनाथ गाडेकर, पोलीस नाईक वीरप्पा करमल, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रविण क्षीरसागर, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज राजा अत्तार, पोलीस कॉन्स्टेबल गणेश गावडे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नाईक फुरकान शेख, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद जाधव या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com