चोरटे सहज ओरबडतात महिलांच्या गळ्यातील दागिने

वर्षभरात 101 घटना || नगरसह शिर्डी, श्रीरामपूर टार्गेट
चोरटे सहज ओरबडतात महिलांच्या गळ्यातील दागिने

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घराच्या बाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने कधी चोरीला जातील याचा नेम नाही. एकटी असलेली महिला शोधून तिच्या गळ्यातील दागिने दुचाकीवरून आलेले चोरटे सहज ओरबाडून धूम ठोकतात. गेल्या वर्षभरात (सन 2022) जिल्ह्यात अशा 101 घटना घडल्या आहेत. त्यातील 55 गुन्ह्याची उकल करून पोलिसांनी 106 गुन्हेगारांना गजाआड केले आहेत. दरम्यान या चोरट्यांनी प्रामुख्याने नगर शहर, शिर्डी, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी टार्गेट केल्याचे येथील घडलेल्या घटनांवरून दिसून येते.

दागिने म्हटले की महिला आवडीने घालतात. मंगळसूत्र तर तिच्या गळ्यात असतेच असते. परंतु गंठण, मिनी गंठण, साखळी (चेन) असे अनेक दागिने तिच्या गळ्यात असतात. सण, उत्सव किंवा एखाद्या समारंभासाठी महिला गळ्यात भरगच्च दागिने घालून घराबाहेर पडते. ती रस्त्याने पायी किंवा दुचाकीवर जात असल्यास तिचा पाठलाग करायचा, निर्जनस्थळी तिला गाठून चालू दुचाकीवर तिच्या गळ्यातील दागिने ओरबाडून धूम ठोकायची. अशा घटना नगर शहरातील तोफखाना, कोतवाली व भिंगार कॅम्प हद्दीत नेहमीच घडत असतात. परंतु या सोनसाखळी चोरट्यांनी आता श्रीरामपूर शहर, राहुरी, संगमनेर व शिर्डी टार्गेट केल्याचे येथील दाखल गुन्ह्यावरून लक्षात येते.

नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या आठ घटनांपैकी एक, तोफखाना हद्दीत झालेल्या 15 घटनांपैकी 11 तर भिंगारमधील चार पैकी दोन गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. याशिवाय श्रीरामपूर शहरात गेल्या वर्षभरात सोनसाखळी चोरीच्या 11 घटना घडल्या. त्यातील सहा गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी केला. राहुरीत सहा तर संगमनेर शहरात नऊ घटना घडल्या आहेत. शिर्डीमध्ये 14 सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या असून त्यातील आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. याबरोबरच लोणी, शेवगाव, पाथर्डी, नेवासा शहरातही सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत.

56 लाखांच्या दागिन्यांची चोरी

गेल्या वर्षभरात झालेल्या सोनसाखळी चोरीच्या 101 घटनांमध्ये 55 लाख 70 हजार 950 रुपयांचे दागिने (सरकारी आकडेवारीनुसार) चोरीला गेले आहेत. त्यातील 55 गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी केला. यादरम्यान 106 चोरट्यांना त्यांनी अटक केली. अटकेतील आरोपींकडून 17 लाख 38 हजार 766 रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. दरम्यान अजूनही 46 गुन्ह्यांचा तपास पोलिसांना लागलेला नाही.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com