नगरमध्ये सोनसाखळी चोरणारा श्रीरामपूरचा गुन्हेगार गजाआड

एलसीबीची कामगिरी || 6.4 तोळे जप्त
नगरमध्ये सोनसाखळी चोरणारा श्रीरामपूरचा गुन्हेगार गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहर व भिंगार येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने ओढून चोरी करणार्‍या श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. रियाज फैय्याज इराणी (वय 42 रा. इराणी गल्ली, ता. श्रीरामपूर) असे जेरबंद केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याकडून तीन लाख 52 हजार रुपये किंमतीचे 6.4 तोळे (64 ग्रॅम) सोन्याचे दागिने जप्त केले आहे.

दरम्यान त्याने कोतवाली पोलीस ठाण्यातील दोन तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यातील एका दाखल गुन्ह्याची कबुली दिली आहे. 15 जानेवारी, 2023 रोजी माया किरणकुमार वनारसे (वय 40, रा. सुर्यानगर, तपोवन रोड) या नगर-औरंगाबाद रोडवरील फिरोदिया वृध्दाश्रमासमोरून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण ओरबाडून नेले होते. सदर घटने बाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नगर शहरासह उपनगरातील सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता. तपासादरम्यान एक इसम चोरी केलेले सोने विक्री करण्यासाठी श्रीरामपूर येथील शिवाजी चौकात येणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकास कळवून खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये पथक तात्काळ शिवाजी चौक येथे जाऊन सापळा लावुन थांबलेले असताना एक संशयित इसम पोलीस पथकास पाहून पळून जाऊ लागला. पथकातील पोलीस अंमलदार यांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव रियाज फैय्याज इराणी (वय 42, रा. इराणी गल्ली, ता. श्रीरामपूर) असे सांगितले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने डिसेंबर व जानेवारीमध्ये अहमदनगर शहर परिसरात साथीदारासह सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली.

पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोालीस अंमलदार भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, मनोहर शेजवळ, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, राहुल सोळुंके, लक्ष्मण खोकले, रणजीत जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, मच्छिंद्र बर्डे, भरत बुधवंत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

नगरसह नाशिक, पुण्यात गुन्हे

रियाज फैय्याज इराणी याचे विरूध्द पुणे, नाशिक व नगर जिल्ह्यात जबरी चोरी, सोनसाखळी चोरी व फसवणूक असे एकूण 20 गुन्हे दाखल आहेत. भद्रकाली (पुणे), पुणे, समर्थ, पिंप्री, चतुश्रृंगी (पुणे) पंचवटी (नाशिक), उपनगर (नाशिक), इंद्रानगर (नाशिक), गंगापूर (नाशिक), मसरूळ (नाशिक), शाहुपुरी, सरकारवाडा (पुणे), तोफखाना, भिंगार कॅम्प, कोतवाली शेवगाव (नगर) या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com