
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
हळदी-कुंकूवाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी लंपास केले. सोमवारी रात्री कोतवाली व तोफखाना हद्दीत या घटना घडल्या. सोनसाखळी चोरट्यांनी एकाचवेळी दोन ठिकाणी हात सफाई केल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. तर पोलिसांसमोर या चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे.
मकर संक्रांतीनिमित्त ठिकठिकाणी हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमासाठी दागिने घालूनच महिला घराबाहेर पडतात. याचा फायदा सोनसाखळी चोरटे घेत आहेत. वैशाली राकेश बोगावत (वय 33 रा. सिव्हिल हाडको, क्रांती चौक) या सोमवारी रात्री साडे आठ वाजता त्यांच्या घरून मुलीला सोबत घेऊन दुचाकीवरून सारसनगर येथील मैत्रिणीकडे हळदी-कुंकूवाचे कार्यक्रमासाठी जात होत्या.
दरम्यान त्या नगर कॉलेजसमोरून पाटील हॉस्पिटलकडे जात असताना फरहत हॉटेलसमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने वैशाली यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून पाटील हॉस्पिटलकडे धूम ठोकली. वैशाली यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
वृषाली ललीत भुमकर (वय 38 रा. बागडपट्टी) या त्यांच्या पतीसोबत दुचाकीवरून सोमवारी रात्री कल्याण रोडवरील एका हळदी-कुंकूवाचे कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेथून त्या पतीसोबत दुचाकीवरून घराकडे येत असताना 9:55 वाजेच्या सुमारास बागडपट्टी येथील चिनी टेलर्स दुकानासमोर वळणावर दुचाकीचा वेग कमी होताच पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने वृषाली यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनी गंठण चोरून नेले. याप्रकरणी ललीत पांडुरंग भुमकर (वय 38) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.