
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
'शहरातील कोतवाली व तोफखाना हद्दीत रविवारी रात्री सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. दोन घटनेत एक लाख 20 हजार रुपये किमतीच्या चार तोळे सोन्याच्या चेन दुचाकीवरील चोरट्यांनी लंपास केल्या. सोनसाखळी चोरट्यांनी शहर पोलिसांसमोर पुन्हा आव्हान उभे केले आहे.
पहिल्या घटनेत दुचाकीवरूनआलेल्या दोन चोरट्यांनी वृध्द महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीची दोन तोळ्याची सोन्याची चेन ओरबाडून नेली. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बुरूडगाव रोडवर ही घटना घडली. शशिकला यशवंतराव भंडारे (वय 84 रा. स्वाती कॉलनी, बुरूडगाव रोड, अहमदनगर) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास फिर्यादी शशिकला भंडारे व मंगल सोमाणी या दोघी बुरूडगाव रोडवरील स्वाती कॉलनीमध्ये पायी फिरत होत्या. समोरून पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी फिर्यादी भंडारे यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची दोन पदरी चेन बळजबरीने ओढून तोडून नेली आहे. दुचाकीवर पुढे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातले होते तर पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या डोक्यात टोपी व पाठीवर बॅग असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दुसर्या घटनेत रस्त्याने पायी जाणार्या महिलेच्या गळ्यातील 60 हजार रूपये किंमतीची दोन तोळे वजनाची सोन्याची चेन दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लंपास केली. सावेडी उपनगरातील आराधना संगितालय, किंग्ज कॉर्नर, रासनेनगर येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा प्रकाश कंठाळे (वय 55 रा. अजिंक्य कॉलनी, बोरूडे मळा, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.
रविवारी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास रेखा कंठाळे व त्यांच्या सोबत आणखी एक जण पायी जात असताना साडेनऊ वाजेच्या सुमारास आराधना संगितालय, किंग्ज कॉर्नर, रासनेनगर येथे पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी रेखा कंठाळे यांच्या गळ्यातील दोन तोळे वजनाची सोन्याची चेन ओरबाडून धूम ठोकली. दुचाकीवरील आलेल्या चोरट्यांनी अंगात काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेले होते. पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या पाठीला एक बॅग असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, कोतवालीचे प्रभारी अधिकारी विजय करे यांच्यासह पोलिसांच्या पथकांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.