महिलेच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे गंठण ओरबडले

सावेडी उपनगरातील घटना || तोफखान्यात गुन्हा
महिलेच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे गंठण ओरबडले
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

महिलेच्या गळ्यातील सव्वा तोळ्याचे सोन्याचे मिनी गंठण दुचाकीवरून आलेल्या दोघांनी ओरबडून नेले. सोमवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सावेडी उपनगरातील सहकारनगरमध्ये ही घटना घडली. सावेडी उपनगरात वाढलेल्या सोनसाखळी चोरीच्या घटनेमुळे महिला वर्गामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात दोघांविरूध्द जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिणी राजेंद्र शेळके (वय 50 रा. वृंदावन कॉलनी, सोनानगर चौकाजवळ, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी सोमवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सहकारनगरमधील मेघराज कॉलनीमधून पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन व्यक्तीपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण बळजबरीने ओरबडून नेले. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता चोरटे दुचाकीवरून सुसाट गेले. फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराची माहिती दिली असून पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके, महिला उपनिरीक्षक एस. यु. मोरे आदींनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास महिला पोलीस मोरे करीत आहेत.

पोलिसांचे अपयश

सावेडी उपनगरात वारंवार घडणार्‍या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यात तोफखाना पोलिसांना अपयश आले आहे. सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तो उघडकीस आणण्यात तोफखाना पोलिसांच्या गुन्हे प्रगटीकरण (डिबी) शाखेलाही अपयश आले आहे. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक सोनसाखळी, बॅग चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी स्थापन केले आहे. त्यांच्याकडूनही अशा घटनांचा तपास होताना दिसत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com