
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
दुचाकीवरून जाणार्या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे गंठण बळजबरीने लांबवले. रविवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास माळीवाडा ते मार्केटयार्ड रोडवर ही घटना घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वर्षा प्रितम मुथा (वय 36 रा. पुनम मोतीनगर, चैतन्य कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे. रविवार 9 एप्रिल रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने फिर्यादी व त्यांची जाव राजश्री प्रफुल मुथा दुचाकीवरून माळीवाडा येथील विशाल गणपतीचे दर्शनासाठी गेल्या होत्या. त्या दर्शन घेऊन घराकडे माळीवाडा ते मार्केेटयार्ड रोडने जात असताना रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास गोवर्धन अपार्टमेंटसमोर पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्याने दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या राजश्री यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे गंठण ओरबाडले.
चोरट्याने जोरात गंठण ओरबाडल्याने फिर्यादी व त्यांची जाव राजश्री या गाडीच्या खाली कोसळल्या. दरम्यान त्यांनी चोरट्यांचा प्रतिकार करून अर्धा तोळ्याचा एक तुकडा वाचवला. मात्र दीड तोळ्याचे गंठण घेऊन चोरटे पसार झाले. कोतवाली पोलिसांना याची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.