तृणधान्य लागवडीत होणारी घट उपासमार वाढवणार

बाजरी, ज्वारी, नाचणी लागवडीत मोठी घट
तृणधान्य लागवडीत होणारी घट उपासमार वाढवणार

वीरगाव (ज्ञानेश्वर खुळे)

संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2023 हे तृणधान्य वर्ष घोषित केले. जगभरात तृणधान्य लागवडीत झालेल्या घटीमूळे त्यांच्या पौष्टिकतेचा जनजागर सुरु झाला आहे. आपल्याकडेही यापेक्षा वेगळी परिस्थिती नसून दरवर्षी बाजरी, नाचणी आणि ज्वारी लागवडीत होणारी घट लक्षात घेता अशीच परिस्थिती राहिली तर धान्याच्या किमती वाढून भविष्यात उपासमार अटळ आहे.

बाजरी, ज्वारी, नाचणी, वरई, राळा आदी पौष्टिक तृणधान्य लागवडीत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि इतर तालुक्यातही मोठी घट होत आहे. लागवडीचा हा आलेख दरवर्षी 10 टक्क्यांच्या उतरणीला असल्याने कृषी खात्याचे अधिकारी आणि या क्षेत्रातील जाणकार सांगतात. ज्वारी, बाजरी वगळता इतर तृणधान्यांची लागवड आदिवासी पट्ट्यात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगात होते. सपाटीकरणाच्या आणि डोंगराळ या दोन्ही क्षेत्रात ही पिके आता अडचणीत आली आहेत.

वेगाने वाढणारी लोकसंख्येची भूक भागविण्यासाठी सरकारने अधिक उत्पादन देणारा गहू आणि तांदळाच्या लागवडीवर भर दिला. पावसाळ्यातल्या खरीपातही नगदी सोयाबीनची लागवड वाढली. कोरडवाहू क्षेत्रातही सिंचनाच्या सुविधा वाढल्याने फळलागवड बहरात आली. दुग्धोद्पादनाची गरज वाढल्याने चा-याचे क्षेत्र वाढले. वेगाने बदलत्या जीवनशैलीला फास्टफूडचे आकर्षण वाढले.

या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे पोष्टिक आणि आरोग्याला फायदेशीर असणा-या तृणधान्याकडे शेतकरी, शास्त्रज्ञ आणि सरकारचेही दुर्लक्ष झाले. आता बदललेल्या जीवनशैलीत आरोग्याच्या समस्या उद्भवल्याने जगाचेच लक्ष तृणधान्याकडे वळले असले तरी तृणधान्यांच्या वाढत्या किमती लक्षात घेता लोकसंख्येच्या प्रमाणात पुरवठा होत नाही हे वाढलेल्या किमतीवरुन सप्रमाण सिद्ध होते.

आता जगभरानेच सन 2023 हे तृणधान्य वर्ष जाहिर करुन तृणधान्याचे महत्व ओळखले आहे. तृणधान्याच्या पौष्टिकतेविषयी जनजागृती आता सुरु झाली आहे. परंतु तृणधान्याची मूल्यसाखळी विकसित केल्याशिवाय शेतक-यांना त्याचा आर्थिक लाभ मिळत नाही तोवर तृणधान्यक्षेत्र लागवडीत वाढ होणार नाही हे सरकारने ओळखायला हवे अन्यथा तृणधान्याचे क्षेत्र कदापिही वाढणार नाही.

मधूमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा यासारख्या शहरी जीवनशैलीतून निर्माण झालेल्या व्याधींशी लढायचे असेल तर तृणधान्यांना पर्याय नाही असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार सांगतात. सरकार, कृषी शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांचे तृणधान्य लागवडीकडे झालेले दुर्लक्ष, नगदी पिकांकडे आणि फळपिकांकडे शेतकऱ्यांचा वाढता कल, धकाधकीच्या जीवनात फास्ट फुडला आलेले महत्त्व यामुळे तृणधान्याची लागवड दिवसेंदिवस घटल्याने एक ना एक दिवस उपासमार अटळ आहे.

तृणधान्ये 50 टक्के घटली

सन 2010-11 च्या तुलनेत आतापर्यंत तृणधान्य लागवड क्षेत्रात 50 टक्केच्या दरम्यान घट झाली आहे. राज्यात सन 2010-11 मध्ये खरीप ज्वारीचे क्षेत्र 10 लाख हेक्टर होते ते दोन लाख हेक्टरवर आले. रब्बी ज्वारी 30 लाख हेक्टरवरुन 13 लाख हेक्टरवर आली. बाजरी 10 लाख हेक्टरवरुन 5 लाख हेक्टर क्षेत्रावर सध्या उभी राहते. नाचणीचे क्षेत्रही सव्वा लाख हेक्टरवरुन 75 हजार हेक्टरवर आले. यासह राळा, वरई लागवड क्षेत्रातही मोठी घट झाली आहे. कृषी खात्याचे अधिका-यांना विचारले असता दरवर्षी तृणधान्य लागवडीत 10 टक्के होत असल्याची खात्रीलायक माहिती त्यांनी दिली. अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात तृणधान्य सेवनाचे काय हा भय उत्पन्न करणारा प्रश्न ठरेल.

अनारोग्याच्या समस्या

हल्ली जन्मत: उपजत मधूमेह असणारे रुग्ण मिळून येतात.उच्च रक्तदाब, लठ्ठपणा हे तर घरोघरी ठाण मांडून आहेत.हॉटेलिंग आणि फास्टफूडची चटक तृणधान्य सेवनाकडे दुर्लक्ष करते त्यामुळे शरीरासाठी पौष्टिकतेचे सेवन होत नाही.अशीच परिस्थिती राहिल्यास आगामी काळ हा भविष्य निर्माणाऐवजी आजारांशी झुंजण्यातच जाईल.सरकार आणि कृषीतज्ञांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com