सीईंओसह अधिकार्‍यांच्या 462 ठिकाणी अचानक भेटी

सकाळच्या सत्रातील शाळांच्या भेटी दरम्यान मिळाले चांगले आणि वाईट अनुभव
सीईंओसह अधिकार्‍यांच्या 462 ठिकाणी अचानक भेटी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शिक्षक संघटनांच्या मागणीनूसार सोमवार (दि.5) पासून जिल्ह्यातील शाळांची वेळ ही सकाळी करण्यात आली आहे. काल पहिल्याच दिवशी प्रभारी सीईंओ संंभाजी लांगोरे, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्यासह जिल्हाभर गटशिक्षणाधिकारी अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी एकाच वेळी सकाळच्या सत्रात भरणार्‍या शाळांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान चांगला आणि वाईट असे दोन्ही अनुभव अधिकार्‍यांना आले.

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी लांगोरे आणि शिक्षणाधिकारी पाटील यांनी सकाळी 6 वाजून 57 मिनीटांनी नगर तालुक्यातील नेप्ती गावाजवळील होळकर वस्ती शाळेला भेट दिली. त्यावेळी संबंधीत शाळाच बंद होती. त्यानंतर नेप्ती गावातील शाळेला 7 वाजून 5 मिनिटांनी भेट दिली. यावेळी शाळेवर असणार्‍या पाचपैकी 2 शिक्षक गैरहजर होते. तर एक शिक्षिका उशीरा आल्या. त्यानंतर याच परिसारातील रानमळा शाळेला भेट दिली. शाळेतील स्वच्छता, नियोजनबध्द परिपाठ पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी लांगारे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी अचूक उत्तरे दिली. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी लांगारे यांना आढळलेल्या त्रुटी आणि गैरहजर तसेच उशीरा येणार्‍या शिक्षकांवर थेट कारवाई करण्याचे आदेश त्यांनी नगरच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना दिले आहेत.

अशीच तपासणी काल सकाळी सातपासून जिल्हाभर राबविण्यात आली. जिल्ह्यात गटशिक्षणाधिकारी आणि त्यांच्या टिमने 462 शाळांना भेटी दिल्या. यात त्यांना चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव आले. अनेक ठिकाणी शाळांची वेळ सकाळची असतांना विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. तसेच अनेक शाळांचा परिसर अस्वच्छ असल्याचे निदर्शनास आले आहेत. संबंधीत ठिकाणी शिक्षकांना सुचना देण्यात आल्या असून बिगर परवानगी गैरहजर शिक्षकांवर कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

महिला शिक्षिका संतप्त

जिल्ह्यातील शाळांची वेळ ही सकाळी करण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात आली. प्रशासनाने देखील शाळांची वेळ सकाळची केली. मात्र, सकाळी शाळा करत असतांना त्यात वेळेची मेख मारण्यात आली असून सकाळी सात वाजता शाळा भरवण्यात येत आहेत. यामुळे लांब अंतराहून येणार्‍या महिला शिक्षकांना घरातील सर्व कामे उरकून सात पूर्वी शाळेत हजर राहवे लागत आहे. यामुळे महिला शिक्षिका चांगल्याच संतप्त झालेल्या आहे.

तालुकानिहा तपासणी झालेल्या शाळा

अकोले 82, जामखेड 13, कर्जत 14, कोपरगाव 19, नगर 9, नेवासा 29, पारनेर 23, पाथर्डी 45, राहाता 22, राहुरी 16, संगमनेर 32, शेवगाव 84, श्रीगोंदा 64 आणि श्रीरामपूर 10 यांचा समावेश आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com