सीईओ निश्चित करणार उद्या अवघड क्षेत्रातील शाळा

प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे अधिकार पुन्हा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे
सीईओ निश्चित करणार उद्या अवघड क्षेत्रातील शाळा
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगरसह राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या यंदाही होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे. मात्र, बदल्यांची प्रक्रिया करण्याची वेळ आल्यास त्यासाठी जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यासाठी बुधवार (दि.5) जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठक बोलावली आहे. गेल्या वर्षी करोनामुळे शिक्षकांच्या बदल्या झाल्या नव्हत्या. यंदा ग्रामविकास विभाग काय निर्णय घेणार याकडे शिक्षकांचे लक्ष आहे. दरम्यान 7 एप्रिलच्या 2021 शासन निर्णयानूसार शिक्षकांच्या बदल्याचे अधिकार पुन्हा जिल्हा परिषद सीईंओकडे सोपविण्यात आले आहेत.

गेली काही वर्षे प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या राज्य पातळीवरून ऑनलाईन होत आहेत. बदली पात्र शिक्षकांनी ऑनलाईन भरून दिलेल्या माहितीच्या आधारे एकाच वेळी राज्यातील सर्व शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया पार पडत होती. या बदल्यांमध्ये अशंत: बदल करण्याचा अधिकार देखील मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नव्हता. बदल्यामध्ये काही चुक झाल्यास त्यासाठी विभागीय आयुक्तांच्या पातळीवर अपिल करण्यात येत होते.

दरम्यान, या ऑनलाईन बदल्या राज्य पातळीवरून होत असल्या तरी जिल्हा पातळीवर असणार्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असणारी समिती जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करत असे. या समितीत उपजिल्हाधिकारी निवडणूक विभाग, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग, विभाग नियंत्रक राज्य परिवहन मंडळ आणि शिक्षणाधिकारी प्राथमिक हे सदस्य आहेत. ही समिती जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करत.

अवघड क्षेत्रातील शाळा ठरवितांना संबंधीत शाळा ही नक्षलग्रस्त अथवा पेसा क्षेत्रात असणार्‍या गावातील असावी, वार्षिक सरासरी पर्जन्यमान 2 हजार मिलीमीटर पेक्षा जास्त किंवा नैसर्गिक आपत्तीने संपर्क तुटणारे गाव (महसूल विभागाच्या माहितीनूसार), हिसंक वन्य प्राण्याचा उपद्रव असणारा जंगलव्याप्त प्रदेश (संबंधीत उप वनसंरक्षक यांच्या अहवालानुसार), वाहतुकीच्या सुविधांच्या अभाव असणारे गावे, वाहतुकीस योग्य रस्त्यांचा अभाव असणारी गावे, रस्त्यांनी न जोडलेल्या शाळा, (बस, रेल्वे अथवा अन्य सार्वजनिक वाहतूक सुविधा नसणे), संवाद छायेचा प्रदेश (संबंधीत बीएसएनच्या महाप्रबंधक यांचा अहवालानुसार), डोंगरी भाग प्रदेश (नियोजन विभागाच्या शासन निर्णयानुसार), राष्ट्रीय महामार्गापासून 10 किलो मीटर पेक्षा जादा दूर असणारे गावातील प्राथमिक शाळा या अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करण्यात येणार आहेत. दर तीन वर्षांनी यांचे अवलोकन करण्याचे ग्रामविकास विभागाचे आदेश आहे. या निकषानुसार बुधावारी मुख्य कार्यकारी अधिकारी हे नगर जिल्ह्यातील अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करणार आहेत. सरकारने ठरवून दिलेल्या सात निकषांपैकी कोणत्याही तीन निकषात बसणार्‍या प्राथमिक शाळा या अवघड शाळा होणार आहेत.

2018-19 ला जिल्ह्यात 368 शाळा या अवघड क्षेत्रातील शाळा घोषित करण्यात आल्या होत्या. यावेळी या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात राजकीय हस्तक्षेप आणि गोंधळ झाला होता. यामुळे यंदा अवघड क्षेत्रातील शाळांची निवड करताना विना हस्तक्षेप या शाळांची निवड व्हावी, अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे.

तीन वर्षे अवघड क्षेत्रात काम करणार्‍या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदली झाल्यानंतर त्याठिकाणी त्यांची सेवा पुढील 10 वर्षे गृहीत धरून तदनंतरच त्यांची बदली होणार आहे. तसेच राज्य पातळीवरून होणार्‍या ऑनलाईन बदल्यांमध्ये गोंधळ झाल्याने संबंधीत शिक्षकांनी न्यायालयात तक्रार केल्यानंतर याबदल्यांशी मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा शिक्षणाधिकारी यांचा संबंध नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर आता पुन्हा शिक्षकांच्या बदल्या करण्याचा अधिकार जिल्हा पातळीवर सीईओंच्या पातळीवर सोपविण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com