मुख्याधिकारी चव्हाण यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करू - डॉ. पिपाडा

मुख्याधिकारी चव्हाण यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी पाठपुरावा करू - डॉ. पिपाडा

राहाता |वार्ताहर| Rahata

मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवीन मुख्याधिकारी तुषार आहेर यांची नियुक्ती करण्यात आली. नगरच्या जिल्हाधिकार्‍यांनी चंद्रकांत चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. यासाठी आपण पाठपुरावा करीत आहोत अशी माहिती भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी दिली.

डॉ. पिपाडा म्हणाले, मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांच्याविरोधात अनेक तक्रारी पुराव्यासह आमच्याकडे आहेत. मर्जीतील ठेकेदाराला काम देण्यासाठी निविदा मॅनेज करणे, विकास कामांच्या नावाखाली कामे न करताच देयके अदा करणे, दि. 15 ऑगस्ट सारख्या राष्ट्रीय कार्यक्रमास गैरहजर राहणे. तसेच विना परवानगीने दीर्घकाळ गैरहजर राहणे, विकास कामांच्या नावाखाली कामे न करताच देयके अदा करणे आणि पूर्ण झालेल्या कामांची देयके जाणून-बुजून अडकवून ठेवणे, बांधकाम परवानगीसाठी लोकांची पिळवणूक करणे, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अवहेलना अशा स्वरुपाच्या गंभीर तक्रारी पुराव्यासह आम्ही शासनास सादर केलेल्या असून जिल्हाधिकारी अ. नगर यांनी जिल्हा प्रशासन अधिकार्‍यांना प्रत्यक्ष राहात्याला चौकशी करायला पाठविले होते.

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी यांची चौकशी समिती नेमली होती. जिल्हाधिकारी यांनी दि. 11 मे रोजी विभागीय आयुक्त नाशिक यांना मुख्याधिकारी चव्हाण यांच्यावर कारवाई करणेबाबतचा प्रस्ताव पाठवला होता. तसेच दि.16 जून रोजी प्रधान सचिव नगरविकास विभाग यांना जिल्हाधिकारी नगर यांनी मुख्याधिकारी चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव पाठवला.

तसेच दि.6 जुलै रोजी महसूल आयुक्त नाशिक यांनी शासनाकडे चव्हाण यांच्यावर कारवाईसाठी अहवाल पाठविला आहे. आम्ही एवढ्यावरच थांबणार नसून चंद्रपूर व अ.नगर जिल्हाधिकार्‍यांनी चंद्रकांत चव्हाण यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनास पाठवलेल्या प्रस्तावाचा पाठपुरावा करू व कारवाई व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहोत, असेही डॉ. पिपाडा म्हणाले.

राहाता नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत चव्हाण यांची बदली होताच शहरातील नागरिकांनी फटाके वाजवून त्यांच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला हे शहराच्या इतिहासात प्रथमच घडले.

- डॉ.राजेंद्र पिपाडा.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com