कोपरगावात काळ्या फिती लावून केला केंद्र सरकारचा निषेध

कोपरगावात काळ्या फिती लावून केला केंद्र सरकारचा निषेध

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

उत्तर प्रदेशातील लखीमपूर मध्ये शांततेने आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने चिरडून ठार मारले. यामध्ये चार शेतकर्‍यांसह आठ नागरिक मारले गेले. जगाच्या पोशिंद्याला अशाप्रकारे ठार मारण्याच्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. त्या निषेधार्थ राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्यावतीने सोमवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु कोपरगाव शहरात बंद न पाळता व्यापार्‍यांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध केला. शहर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देऊन या घटनेतील आरोपींना कठोर शासन करावे, अशी मागणी केली आहे.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले, जे सरकार शेतकर्‍यांना गाडीखाली चिरडून ठार मारते व जे शेतकरी मागील एक वर्षापासून दिल्ली येथे कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहे त्या शेतकर्‍यांशी चर्चा करायला येत नाही. या शेतकरी विरोधी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी व शेतकर्‍यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असल्याचे सांगितले. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यामुळे व देशभरातील जनतेच्या रेट्यामुळे या घटनेतील गुन्हेगार मंत्री पुत्राला उशिरा अटक करण्यात आली. मात्र केंद्र सरकारने या मंत्र्याचा अद्यापही राजीनामा घेतलेला नाही याचा निषेध करत आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे म्हणाले, अशी घटना जर महाराष्ट्रात घडली असती तर विरोधी पक्षाने सरकारवर बोट ठेवून निदर्शन आंदोलन केले असते. मात्र उत्तर प्रदेशमध्ये एवढी मोठी घटना घडून देखील या घटनेतील गुन्हेगार असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही. सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केल्यानंतर गुन्हा दाखल झाला त्यावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरून या प्रकरणाला धर्माचा रंग भाजप सरकार देत असल्याचे चुकीचे असून शेतकर्‍यांवर झालेल्या अन्यायाच्या विरोधातील लढाई असून या लढाईत कोपरगावच्या व्यापार्‍यांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला त्याबद्दल आभार मानले.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले, कोपरगाव शहर महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आलेला बंद यशस्वी झाला असून लखीमपूरमध्ये घडलेल्या घटनेचा व काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना अटक केलेल्या घटनेचा निषेध करीत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तुषार पोटे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष सुनील गंगूले, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, शिवसेना शहराध्यक्ष कलवींदरसिंग डडियाल, काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, नगरसेवक गटनेते वीरेन बोरावके, मंदार पहाडे, सुनील शिलेदार, राजेंद्र वाकचौरे, भरत मोरे, प्रफुल्ल शिंगाडे, फकीर कुरेशी, दिनकर खरे, डॉ. तुषार गलांडे, जावेद शेख, प्रकाश दुशिंग, राहुल देवळालीकर, राजेंद्र खैरनार, संदीप कपिले, वाल्मिक लहिरे, सुनील तिवारी, अस्लम शेख, इरफान शेख, बाबुराव पवार आदींसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.