
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
आठ वर्षापासून मनपाच्या अंदाजपत्रकीय सभेमध्ये सावेडी स्मशानभुमीसाठी जागा (Savedi Cemetery Land) उपलब्धतेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. याचा अभ्यास न करता विरोधाला विरोध करायचा म्हणून या विषयाला विरोध सुरू आहे, अशी भुमिका महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांनी मांडली आहे. सावेडी उपनगरासाठी स्मशानभुमी आवश्यकच आहे. त्यासाठी महानगरपालिकेचे (Ahmednagar Municipal Corporations) आर्थिक नुकसान होणार नाही अशी कार्यवाही करू, असे त्यांनी म्हटले आहे.
32 कोटींच्या जागा खरेदीवरून शहराचे राजकारण तापले आहे. यावर महापौरांनी प्रथमच खुलासा केला असून आरोप करणार्यांवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महानगरपालिकेच्या 25/11/2022 रोजीच्या महासभेमध्ये सावेडी उपनगरासाठी स्मशानभुमीची जागा उपलब्ध करण्याबाबतचा विषय होता. सावेडी उपनगरासाठी स्मशानभुमीची जागा घेण्याबाबत यापूर्वी देखील महासभेमध्ये विषय घेण्यात आला होता. त्यावेळी आता विरोध करणा-या कोणत्याही सदस्याने या विषयावर चर्चा केली नाही.
जागा कशी उपलब्ध होईल, याबाबत सुचना मांडल्या नाहीत. गेल्या सात आठ वर्षापासून मनपाच्या अंदाजपत्रकीय सभेमध्ये सावेडी स्मशानभुमीसाठी जागा उपलब्धतेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. याचा अभ्यास न करता विरोधाला विरोध करायचा म्हणून या विषयाला विरोध सुरू आहे. सावेडी उपनगरामध्ये लोकवसाहत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तेथील लोकसंख्या अंदाजे दोन लाखांच्या आसपास आहे. सावेडी उपनगरामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे नागरिकांना अंत्यविधीसाठी अडचणींना सामोरे जावे लागते. पावसाळ्यात अंत्यविधीसाठी शहरात येताना मोठया प्रमाणात समस्या निर्माण होतात.
रात्रीच्या वेळी अंत्यविधी करण्यासाठी शहरात जावे लागत असल्याने वाहने उपलब्ध होत नाहीत. सावेडी भागात स्मशानभूमी व्हावी ही उपनगरवासियांची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. कोवीड काळात नालेगांव अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा उपलबध होत नव्हती. आता या विषयाला विरोध करणार्यांनी सावेडीकरांना अंत्यविधीसाठी होणार्या त्रासाचा कधी विचार केलेला दिसून येत नाही. यांनी अहमदनगर महानगरपालिकेस सावेडी स्मशानभुमीसाठी जागा दाखविली आहे का किंवा जागा उपलब्ध होण्यासाठी कोणते प्रयत्न केले, हा देखिल महत्वाचा प्रश्न आहे. स्मशानभुमीसाठी आरक्षणाची जागा आहे, अशी बोंबाबोब करणारे इतके वर्ष गप्प का बसले? महासभेमध्ये सावेडी स्मशानभुमीसाठी जागेबाबत चर्चा झाली त्यावेळी या सदस्यांनी आरक्षणाची जागा घेण्याबाबत का सुचना मांडली नाही.
आजच त्यांना आरक्षीत जागेची माहिती झाली का? जागा मनपाने ताब्यात घ्यावी असे कोणते प्रयत्न यांनी केले, हे त्यांनी आधी सांगावे. ज्यांच्या जागेवर आरक्षण पडले त्यांनी जागा देण्यास नकार दिला किंवा काय याची शहानिशा न करताच प्रसिध्दी मिळविण्यासाठी आरोप केले जात आहेत. विरोध करणार्या सदस्यांनी सभागृहामध्ये थांबून आपले मत मांडले पाहिजे. चर्चा करायला पाहिजे होती. स्मशानभुमीसाठी सावेडी भागामध्ये असलेल्या जागेची माहिती देणे क्रमप्राप्त होत.
विषयावर चर्चा करण्यासाठी सभागृहात न थांबता प्रसिध्दीसाठी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करित आहे. सावेडीच्या नागरिकांसाठी स्मशानभूमी व्हावी, यादृष्टिने हा विषय घेण्यात आला होता. जागा घेण्यासाठी मनपाचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची काळजी घेवून सावेडी स्मशानभुमी होण्याची कार्यवाही केली जाईल. सावेडीकरांसाठी स्मशानभुमीची आवश्यकता लक्षात घेता हा विषय मार्गी लावण्याच्या दृष्टिने प्रयत्न करण्यात येतील, असे महापौरांनी म्हटले आहे.
32 कोटी रस्ते, पाणी, आरोग्यासाठी खर्च करा : फुलसौंदर
सावेडी परिसरात स्मशानभूमी साठी नवीन जागा खरेदी करण्यासाठीचा 32 कोटीचा ठराव मनपाच्या हिताचे नुकसानकारक आहे. सावेडी परिसरातील वाढती लोकसंख्या विचारात घेऊन स्मशान भूमीची सावेडीकरांना नितांत गरजेची आहे, परंतु मनपा विकास आराखडयातील आरक्षित जागेवरच स्मशानभूमी व्हावी, अशी मागणी माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनी केली आहे. मनपा स्थापनेनंतर शहर विकास आराखडयामध्ये शहरांच्या चारही भागांसाठी (सावेडी, केडगाव ,बुरूडगाव, माळीवाडा) शाळा, हॉस्पिटल, कचरा डेपो, स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित केलेल्या आहेत. सर्व विभागांसाठी जागा आरक्षित असताना नवीन सावेडी स्मशानभूमी साठी मनपाची आर्थिक स्थिती बिकट असताना जागा खरेदी करणे अयोग्य आहे. 32 कोटीचा खर्च नगर शहरामधील रस्ते, पाणी, आरोग्य यावर खर्च झाला तर तो नगरकरांसाठी सुयोग्य राहील. शहर हितासाठी ठराव विखंडीत करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.