म्हसणवाटा घोटाळा विखंडीत करा

समविचारी पक्षसंघटनांचे महापालिकेत आंदोलन
म्हसणवाटा घोटाळा विखंडीत करा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील शहर सुधार समितीसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, उर्जिता सोशल फौंडेशनसह अन्य समविचारी पक्षसंघटनांच्यावतीने मनपामध्ये आंदोलन करण्यात आले. 32 कोटींचा म्हसणवाटा घोटाळा ठराव विखंडीत करून नगरसेवकांचे पद रद्द करा. घोटाळ्याचे मास्टरमाइंड नगररचनाकार राम चारठाणकर यांना तात्काळ निलंबीत करा, तसेच कलम 133-अ नुसार शहरवासियांना घरपट्टी माफीचा ठराव मंजूर करा. या मागण्या करण्यात आल्या.

शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि महापौरांचे प्रतिनिधी राजू लयचेट्टी व किशोर कानडे यांना मागणीपत्र दिले. शिष्टमंडळात संजय झिंजे, संध्या मेढे, भैरवनाथ वाकळे, राजेंद्र कर्डीले रवि सातपुते, सिध्देश्वर कांबळे, विजय केदारे, दिलीप घुले, अमोल चेमटे, संतोष गायकवाड, फिरोज शेख, गणेश मारवाडे, दिपक शिरसाठ, तुषार सोनवणे, क्षिरसागर आदी उपस्थित होते.

आयुक्तांना प्रत्यक्ष भेटून अहमदनगर मनपा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आर्थिक हितास बाधा आणणारा तसेच संगनमताने आर्थिक कट करून, निधीचा अपव्यय, पदाचा दुरूपयोग, गैरवापर करत बेकायदेशिर मंजूर करण्याचा घाट घातलेला वरील संदर्भिय क्रमांक 8 दि. 25/11/2022 चा ठराव क्र. 27 म. म्यु. कॉ. क्ट 1949 कलम 451 नुसार विखंडीत करण्यासाठी राज्यशासनाकडे पाठवून ठराव महासभेसमोर मांडणारे महापौर तथा यासंबंधित 32 कोटींच्या म्हसणवाटा घोटाळ्यास मान्यता देणारे इतर नगरसेवक यांची महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन कायदा 1949 कलम 10 व 13 नुसार नगरसेवक पद रद्द करावे. म्हसणवाटा घोटाळ्याचे कर्तेधर्ते मास्टरमाईंड नगररचनाकार राम चारठाणकर यांना तात्काळ निलंबन करावे तसेच कोविड आपत्तीकाळात शहरातील जनतेस कलम 133-अ नुसार घरपट्टीमाफी देण्याचा ठराव तात्काळ सभा घेऊन मंजूर करावा. या मागण्या करण्यात आल्या.

मागणीपत्रात पुढे म्हटले की, शहर सुधारणा समितीसह शहरातील सर्व पुरोगामी पक्ष संघटना कोविडच्या संकटकाळापासून म्हणजे 2020-21 पासून शहरातील जनतेच्या हितासाठी आपणाकडे पाठपुरावा करत आहोत. यासाठी मोर्चे, आंदोलने, सह्यांची मोहिम तसेच प्रत्यक्ष आपणास भेटून या विषयाचे गांभिर्य निदर्शनास आणून दिलेले आहे. सभागृहातील सदस्य हे शहरातील जनतेच्या हितासाठी निवडून दिलेले आहेत याचा विसर पडलेला दिसत आहे.

उलट दोन दिवसापुर्वीच उघड झाले आहे की, अहमदनगर शहरातील जनतेच्या कायदेशिर हक्काची घरपट्टी माफीची मकलम 133-अफ ची मागणी काही नगरसेवक व पदाधिकारी यांनी अव्हेरून 32 कोटी रूपयांचा म्हसणवाटा घोटाळा केलेला आहे. म्हसणवाटा घोटाळा हि शरमेची बाब आहे. या घोटाळ्यामुळे शहरात सर्वच मनपा सदस्यांची नाचक्की होत आहे. सर्वच धर्मात अंत्यविधी कार्य हे पुण्याचे काम समजले जाते पण आपल्या महानगरपालिकेत यातही भूखंडातील श्रीखंड लाटण्याचे महान काम आपले लोकप्रतिनिधी रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने करत आहेत. हे ऐकून अहमदनगरकर जनतेची शरमेने मान खाली गेली आहे.

कोविड नैसर्गिक आपत्तीकाळात जगाने माणुसकीचे दर्शन घडविले. अनेकांनी मानवतेची जनहिताची कामे केली. पण या सर्वांवर शरमेने मान खाली घालण्याची वेळ यावी असे काम महानगरपलिकेतील म्हसणवाटा घोटाळा करणार्‍या जनताद्रोही नगरसेवकांनी केले आहे. हे काम मनपा सदस्य आपले कर्तव्य पार पाडत असताना केलेले गैरवर्तन आणि अत्यंत लज्जास्पद कृत्य, शहरातील जनतेच्या हिताविरूध्द केलेले काम तसेच कर्तव्यात केलेली कसूर आहे. म्हसणवाटा घोटाळ्याचे कर्तेधर्ते मास्टरमाईंड नगररचनाकार राम चारठाणकर यांना तात्काळ निलंबित करावे.

नुकताच राज्य मंत्रीमंडळाने काही दिवसांपूवी कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मुल्याधारीत मालमत्ता दर न बदलण्याचा मंत्रीमंडळ निर्णय घेतलेला आहे. त्याची व्यापक प्रसिध्दी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ती आपल्या वाचनात आलेलीच असावी. मुंबईतील जनतेला कोविड नैसर्गिक आपत्तीकाळातील सवलत देवून राज्य सरकारने मोठा दिलासा दिलेला आहे.

अशीच मागणी आम्ही आपणाकडे गेली दोन वर्ष करत आहोत. आपणही लवकरता लवकर खास सभेमधेवरील विषय घेऊन मंजूर करून राज्यमंत्रीमंडळास मंजूरीसाठी पाठवावा. जेणे करून अहमदनगर शहरातील सामान्य मालमत्ताधारक, शेतकरी, धार्मिक संस्था तसेच व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल.

यासाठी आपणाकडे मागणी करत आहोत कि, तात्काळ या विषयासाठी खास सभेची विषयपत्रिका (अजेंडा) त्यामधे वरील विषय समाविष्ठ करून तो मंजूर करून राज्यशासनास मंत्रीमंडळ बैठकीत मंजूरीसाठी पाठवावा. अन्यथा आम्ही आपल्या दालनात उपोषण, धरणे आंदोलन करू, याच्या होणार्‍या परिणमांची जबाबदारी आपली असेल. असा इशारा या पक्ष संघटनांनी दिलेल्या निवेदनात आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com