आठ पट जास्त दर लावून सिव्हिलमध्ये बसविले सीसीटीव्ही

जिल्हा शल्सचिकित्सकांनी 33 लाख लाटल्याचा शिवसेनेचे जाधव यांचा आरोप
आठ पट जास्त दर लावून सिव्हिलमध्ये बसविले सीसीटीव्ही

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्हा शासकीय रूग्णालयात सीसीटीव्ही खरेदीमध्ये घोटाळा झाल्याची बाब शिवसेना पदाधिकार्‍यांनी माहिती अधिकाराचा वापर करून उघडकीस आणली आहे. तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आणि विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्या कार्यकाळात सीसीटीव्ही खरेदी घोटाळा झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी केला आहे. अधिकारी आणि सीसीटीव्ही पुरविणारा ठेकेदार यांनी संगनमताने आठ पट जास्त दराने सीसीटीव्ही खरेदी केलेले आहेत. अवघ्या चार ते पाच लाख रुपयांना मिळणारी सामुग्री कागदोपत्री 38 लाख रुपये खर्चून बसविण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.

याबाबत जाधव यांनी आरोग्य मंत्रायल, आरोग्य उपसंचानालय, नाशिक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करावी आणि जबाबदार अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात भ्रष्टाचाराच्या गुन्ह्याची नोंद करून त्यांना अटक करावी, अशी मागणी केली आहे. संबंधित ठेकेदाराकडून ही रक्कम वसूल करून त्याला देखील अटक करावी, अशी जाधव यांची मागणी आहे.

नाशिकचे आरोग्य उपसंचालक डॉ. एम. आर. पट्टणशेट्टी यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना सीसीटीव्ही बसविण्याची परवानगी दिली होती. त्यात त्यांनी ही साहित्य खरेदी ई टेंडर करून करावी असे नमूद केले होते. ई टेंडरिंग न करता किंवा कोणत्याही पेपरमध्ये जाहिरात न देता फक्त जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नोटीस बोर्डवर ही टेंडर नोटीस चार दिवस लावण्यात आली होती. हे काम सिद्धांत एंटरप्रायजेसला 38 लाख 30 हजार 91 रूपयांना देण्यात आले. नाशिक उपसंचालकांना हे दर पत्रक मंजुरीसाठी पाठविण्यात आले.

या प्रस्तावाला मंजुरी देताना विभागीय उपसंचालकांनी हे खरेदी जेम पोर्टलवर इ टेंडरिंग करूनच करावी, असे नमूद करण्यात आले होते. मात्र, तसे न करता त्यांनी सिद्धांत एंटरप्रायजेसकडून काम करून घेतले आणि नंतर बिलही अदा केले. बिल देताना त्यावर तारीख, वार याचा कोणताही उल्लेख केला नसल्याचे जाधव यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com