
राहाता | Rahata
शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राहाता शहरातील विविध चौकांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येत असून गुन्हेगारी व अपप्रवृत्ती रोखण्याकरिता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून प्रशासन या कॅमेरेद्वारे करडी नजर ठेवणार असल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
राहाता शहरात मोठ्या प्रमाणात वाढती गुन्हेगारी, गंठण चोरी, रोडरोमिओंचा शालेय विद्यार्थिनींना होणारा त्रास, वाहन चालकांकडून होणारे नियमाचे उल्लंघन, कायदा सुव्यवस्थेबाबत निर्माण होणार्या विविध समस्या नागरिकांना दैनंदिन मोठी डोकेदुखी ठरत आहे. शहरात सातत्याने निर्माण होणार्या या समस्यांना तात्काळ लगाम घालावा, अशी अनेक वर्षापासून नागरिकांची मागणी होती.
या समस्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने पोलीस प्रशासनाला या वाढत्या गुन्हेगारीने आव्हान दिले. त्यामुळे त्यांना देखील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुरावा नसल्याने कारवाई करण्याकरिता मोठी अडचण निर्माण होत होती. शहरात विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे गुन्हेगार या बाबींचा फायदा घेतात. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांचे मनोबल अधिक वाढत चालल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या गोष्टींना चपराक बसावी व शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नागरिकांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नावर मार्ग काढावा, अशी मागणी केली होती. ग्रामस्थांची मागणी लक्षात घेता व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ना. विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद, ग्रामपंचायत व पोलीस अधिकारी यांची बैठक घेऊन शहरातील महाविद्यालय व शाळेसमोर विद्यार्थिनींना कुठल्याही प्रकारचा रोड रोमिओंचा त्रास झाला तर तात्काळ पोलीस अधिकारी यांच्या मोबाईलवर संपर्क साधावा, असे फलक प्रवेशद्वारा जवळ लावण्याच्या सूचना केल्या.
या सूचनांची अंमलबजावणी प्रथम राहाता तालुक्यातून झाल्याने पालकांनी मोठे समाधान व्यक्त केले. याबरोबर आता शहरातील विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला. नगरपरिषदेचे प्रशासक तुषार आहेर यांनी त्यांच्या सूचनांची अंमलबजावणी करीत तात्काळ शहरात विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची कारवाई सुरू केली आहे. शहरात विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना या उपक्रमामुळे मोठी चपराक बसणार आहे. ना. विखे पाटील यांनी घेतलेल्या या निर्णयाचे राहातेकरांनी स्वागत केले आहे.
ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून शहरात विविध भागात मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू केल्याने त्यांच्या दूरदृष्टीपणामुळे विद्यार्थिनी व महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच शहराची कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला मोठी मदत होणार आहे.
- कैलास सदाफळ, राहाता