पाणलोटात पावसाचा जोर वाढला

भंडारदरातून पुन्हा विसर्ग वाढविला || गोदावरीतील विसर्ग 28930 क्युसेकवर
पाणलोटात पावसाचा जोर वाढला

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

गत दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पाणलोटात आषाढ सरी पुन्हा सक्रीय झाल्या आहेत. त्यामुळे धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. काल सायंकाळी भंडारदरातील पाणीसाठा 9844 दलघफू (89.17) टक्के झाला होता. तर धरणातून 3609 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. काल दिवसभर पडलेल्या पावसाची नोंद 49 मिमी झाली आहे.

भंडारदरातून पाणी सोडण्यात येत असल्याने निळवंडेतील पाणीसाठा वाढत आहे. काल सकाळी या धरणातील पाणीसाठा 6773 दलघफू (81.40 टक्के) होता. या धरणातून प्रवरा नदीत 3305 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोटात पाऊस वाढल्याने हा विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुळा पाणलोटातही पावसाने पुन्हा काहीसा जोर पकडल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढला आहे. काल सकाळी कोतूळ येथील 4429 क्युसेक असलेला विसर्ग सायंकाळी 5638 क्युसेक झाला होता. रात्रीतून त्यात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. धरणातील साठा 18139 दलघफू (69.76 टक्के) झाल आहे. आज हा साठा 70 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. काल धरणात 137 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. दरम्यान, राहाता तालुका प्रतिनिधीने कळविले की, दारणा, गंगापूर व अन्य धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीचा विसर्ग 28930 क्युसेकपर्यंत वाढविण्यात आला आहे.

पर्यटकांची गर्दी

काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अकोले तालुक्यातील भंडारदरातील फुललेले सौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दोन वर्षांनंतर या भागातील हॉटेल व अन्य व्यावसायिकांची दुकाने गर्दीने फुलून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com