जातीचा दाखला काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर

पडताळणी समितीच्या चौकशीतून उघड; गुन्हा दाखल
जातीचा दाखला काढण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने जातीचा दाखला काढणार्‍याचा बनाव जातपडताळणी समितीच्या चौकशीत उघड झाला आहे. निरज अरुण परदेशी (स्नेहबंध पार्क, पोलीस वसाहत, नाशिक) याच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जात पडताळणी समितीच्या दक्षता पथकाचे पोलीस निरीक्षक सईदखाँ दादाखाँ पठाण (रा. सुर्यानगर, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

निरज अरुण परदेशी याने 9 ऑगस्ट, 2021 रोजी येथील जात पडताळणी समितीकडे जातीचा दाखला शैक्षणिक कारणास्तव मिळण्यासाठी प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणामध्ये अर्जदार यांनी आजोबा व चुलत आजोबांचा जन्माचा दाखला जोडला होता. आजोबा रामसिंग भाऊसिंग परदेशी व चुलत आजोबा हारिसिंग भाऊसिंग परदेशी यांच्या जन्म दाखल्यावर जातीचा उल्लेख हा हिंदू- रजपूत तर पोटजात म्हणून भामटा असे नमूद केले होते.

या दाखल्याबद्दल जात पडताळणी समितीला संशय आला. त्यामुळे समितीने संगमनेर कार्यालयातील अभिलेख कक्षामध्ये चौकशी केली असता जातीच्या उल्लेखासमोर शाईचे डाग असल्याचे निदर्शनास आले. रजिस्टरला बनावट नोंद करून त्याआधारे बनावट दाखला तयार केला. जात पडताळणी समितीच्या उपायुक्तांच्या आदेशाने निरज अरूण परदेशी याच्याविरूध्द बनावट कागदपत्र तयार करणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com