
शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav
आपल्या भाच्याच्याच घरी सोने व चांदीसह रोख रक्कम चोरी करणार्या आरोपी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. राजू कांतीलाल मोरे असे आरोपी मामाचे नाव आहे. त्याच्याकडून मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथील विक्रम भाईलाल जाधव (वय 23 ) मूळ रा. चिचविरतांडा, जि. नाशिक यांच्या घरी 28 डिसेंबरला चोरीची घटना घडली होती. जाधव यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम 85 हजार रुपये असा एक लाख 45 हजारांचा ऐवज चोरीस गेला होता.जाधव यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर पोलिसांनी चोरीचा तपास लावून आरोपी मोरे (वय 55) रा. सटवाईतांडा जि. जालना याने ही चोरी केली व ऐवज लंपास केल्याचे निष्पन्न झाले.आरोपी मोरे यास पोलिसांनी अटक केली असून आरोपीने सोन्या-चांदीचे साठ हजारांचे दागिने व दहा हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा ऐवज पोलिसांना काढून दिला.
पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे, सचिन लिमकर, पोलीस नाईक संदीप कानडे, ज्ञानेश्वर रसाळ, कृष्णा बडे, दत्तात्रे बडदे, संदिप बडे यांनी तपास करून ही चोरीची घटना उघडकीस आणून आरोपीसह मुद्देमाल हस्तगत केला.