दोन मालवाहू ट्रकांना लावली एकाच क्रमांकाची नंबरप्लेट

परिवहन अधिकार्‍यांच्या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात ट्रक मालकावर गुन्हा दाखल
File Photo
File Photo

नेवासाफाटा |वार्ताहर| Newasa Phata

एकाच क्रमांकाची नंबर प्लेट दोन मालवाहू ट्रकांना वापरून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथील मोटार वाहन निरीक्षक यांनी नेवासा पोलीस ठाण्यात मालवाहू ट्रकच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूरचे मोटार वाहन निरीक्षक सुनील गोसावी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. सुनील गोसावी यांची यांच्या नेतृत्वाखालील वायुवेग पथकाने 16 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजताचे सुमारास सुरेगाव फाटा ता. नेवासा येथे कारवाई करीत असताना रिकामा ट्रक (एमएच 20 ए 1952) तपासणीकामी थांबवून त्यावरील चालकाकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली परंतु त्याच्याकडे कागदपत्र तसेच ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते.

चालकास मूळ मालकाचे नाव विचारले असता त्याने लक्ष्मण शिवाजी चौधरी रा. भातकुडगाव ता. शेवगाव असे सांगितले. तसेच ई-चलान मशीनवर वाहनाचा नोंदणी क्रमांक तपासला असता मूळ मालकाचे नाव लक्ष्मण शिवाजी चौधरी रा. भातकुडगाव ता. शेवगाव असे दिसून आले. वाहन चालकाकडे वाहनाचे कागदपत्र नसल्याने त्याचे वाहनाचा चेसिस नंबर तपासला असता तो बनावट प्रिंट केलेला दिसून आला. तसेच इंजिन नंबर तपासला असता इंजिन नंबर असलेली प्लेटही काढून घेतलेली आढळली. त्यावरून आमची खात्री झाली की सदर ट्रक ही बनावट आहे व तिच्यावर दुसर्‍या वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकून ते वाहन रस्त्यावर चालवले जात आहे व याद्वारे शासनाचा महसूल चुकवून शासनाची फसवणूक केली जात आहे.

मला मोटर वाहन कर कायदा 1958 चे कलम 12 (ब) नुसार असलेल्या अधिकारान्वये सदरची ट्रक ही सोबत घेऊन ती नेवासा एसटी बस डेपो येथे अडकवून ठेवली व त्याबाबत आमचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर यांना कळवले असता त्यांनी मूळ वाहनाचा शोध घेऊन वाहन ताब्यात घेण्याबाबत तोंडी सांगितले.

मूळ वाहनाचा शोध घेतला असता सदरचे मुळ वाहन शेवगाव तालुक्यात मिळून आल्याने ते वाहन पथकातील मोटार वाहन निरीक्षक शाम चौधरी हे नेवासा येथे घेऊन आले. तिचे वरील चालकास वाहनाचे मूळ मालकाबाबत विचारले असता त्यांनी मालकाचे नाव लक्ष्मण शिवाजी चौधरी रा. भातकुडगाव ता. शेवगाव असे सांगितले व ते वाहन देखील पडताळणी कामी नेवासा एसटी डेपो येथे अडकवून ठेवले आहे. त्यानंतर आमची खात्री झाली की, लक्ष्मण शिवाजी चौधरी रा. भातकुडगाव तालुका शेवगाव या दोन वाहनाचा एकच क्रमांक वापरून शासनाचा महसूल चुकवून शासनाची फसवणूक करत आहे.

सदर वाहनाचा चेसिस नंबर हा बनावट प्रिंट केलेला व इंजिन नंबर असलेली प्लेट काढून टाकलेली आढळली व मूळ वाहनाचा शोध घेतला असता तो मिळून आल्याने दोन्ही वाहने ताब्यात घेतली असता दोन्ही वाहनांना एकच क्रमांक असल्याचे दिसून आल्याने आमची खात्री झाली की वाहन मालक लक्ष्मण शिवाजी चौधरी रा. भातकुडगाव तालुका शेवगाव हा एकच नोंदणी क्रमांक वर दोन वाहने चालवत आहे व शासनाचा महसूल चुकवुन शासनाची फसवणूक करत आहे.

याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम 420, 465, 468, 471, 475, 476 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीरामपूर व अहमदनगरच्या उर्मिला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक सुनील गोसावी, श्याम चौधरी, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सुरेश शिंदे, विलास धूम, रूपाली खरसे, संकेत मारवाडी, चालक गणेश गांगोडे या पथकाने सदरची कारवाई केली. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल पुढील तपास करत आहेत.

दोन वाहनांना समान क्रमांक असू शकत नाही

भारतात वाहनाच्या नोंदणी क्रमांकाची व चेसिस क्रमांकाची छेडछाड करणे आणि सोयीनुसार बदल करणे हा मोठा गुन्हा आहे. आरटीओ किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कार, ट्रक, बस आणि दुचाकींना नोंदणी क्रमांक मिळतो. यामुळे पोलिसांना चोरी किंवा गुन्हा घडल्यास वाहनाचा मागोवा घेता येतो. वाहनाचा नोंदणी क्रमांक त्याच्या चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांकाशी जोडलेला असतो. कोणत्याही दोन वाहनांना समान चेसिस क्रमांक, इंजिन क्रमांक आणि नोंदणी क्रमांक असू शकत नाही.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com