कारच्या धडकेत टेम्पो भस्मसात

गंगापूर चौफुलीजवळ दुर्घटना || जिवितहानी टळली
कारच्या धडकेत टेम्पो भस्मसात

वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जाणा़र्‍या दहा जणांच्या टेम्पोला भरधाव कारने जोराची धडक दिल्याने टेम्पो उलटुन सात जण गंभीर जखमी झाले. तर टेम्पोची डिझेल टाकी फुटुन आग लागली. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तातडीने टेम्पोत अडकलेल्यांना बाहेर काढले.

येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींना औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास शहराजवळ गंगापूर चौफुली येथे घडला.

जालना जिल्ह्यातील वंजारवाडी तांडा येथील बंजारा समाजाचे लोक सिन्नर येथे कंदुरीच्या कार्यक्रमासाठी पवन आडे यांच्या टेम्पोने (एमएच 02 वाय एक 5772) नाशिककडे जात होते. गंगापूर चौफुली जवळ आल्यानंतर गंगापुरच्या दिशेने जाणा़र्‍या कारने (एमएच 04 एफआर 9262) त्यांना जोराची धडक दिली.

त्यामुळे टेम्पो उलटला व टेम्पोतील पुजा राठोड (27), शिला राठोड (48), दिवाण राठोड (50), जितेंद्र राठोड (29), अविनाश राठोड, मोहन राठोड (52), पार्वतीबाई राठोड (48) हे गंभीर जखमी झाले. वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अग्निशामन दलाला पाचारण केले व आग विझवण्यात आली. याप्रकरणी वंजारवाडी तांडा येथील कैलास जाधव यांनी कारचालकाच्या विरोधात वैजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com