गाडीच्या काचा फोडून राळेगण थेरपाळमध्ये पळवले दोन लाख

गाडीच्या काचा फोडून राळेगण थेरपाळमध्ये पळवले दोन लाख

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग मनामध्ये धरून पारनेर तालुक्यातील राळेगण थेरपाळ येथील

प्रशांत उर्फ अण्णा किसन कारखिले याने सतीश अशोक कारखिले यांच्या मोटारीच्या काचा फोडून मोटारीतील दोन लाखांची रोकड तसेच मोटारीची कागदपत्रे चोरून नेली. याप्रकरणी सतीश अशोक कारखिले (वय 33 रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

दारू पिण्यावरून सतीश कारखिले व प्रशांत कारखिले यांच्यात घटना घडण्यापूर्वी वाद झाला होता. सतीश याने याच कारणावरून प्रशांत यास मारहाण केली होती. त्याचा राग प्रशांत याच्या मनात होता. रविवार दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी सतीश कारखिले यांची मोटार (क्र. एम एच 16 बी एच 9861) ही राळेगणथेरपाळ गावात एस. टी. स्टॅण्डजवळ रस्त्याच्याकडेला उभी असताना दि. 31 ऑक्टोबर रोजी दारू पिण्यासाठी पैसे का दिले नाहीत याचा राग मनामध्ये धरून प्रशांत याने कारच्या दरवाजाचे नुकसान केले.

मागील बाजूची काच फोडून शिविगाळ करीत तुला काय करायचे ते करून घे, तुमच्या घरातील एकाला तरी घालवितोच, अशी दमबाजी केली. मोटार फोडल्यानंतर गिअर बॉक्सजवळ ठेवलेले दोन लाख रुपये तसेच मोटारीची कागदपत्रे प्रशांत याने चोरून नेल्याचे सतीश कारखिले यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमुद केले आहे.

दरम्यान, कारखिले यांच्या वाहनातून पैसे चोरीस गेल्याच्या घटनेकडे पोलीस संशयाने पाहत असून 2 हजार रुपये मुल्याच्या 50 तर 500 रुपये मुल्याच्या 200 नोटा सतीश कारखिले यांच्याकडे कशा आल्या याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचे साक्षिदारही तपासण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रभारी पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे हे पुढील तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com