कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

बालकासह दोघे जखमी || कल्याण रोडवरील घटना
कारची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लग्न समारंभ उरकून घराकडे निघालेल्या दुचाकीला कारने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमीमध्ये बालकाचा समावेश आहे.

नगर- कल्याण रोडवरील ठाणगे पेट्रोल पंपासमोर सोमवारी (दिनांक 22 मे) रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या प्रकरणी मंगळवारी (दिनांक 23 मे) तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीता प्रकाश आहुजा (रा. नालेगाव, हाडको) असे मयत महिलेचे नाव आहे. अपघातात मिनाक्षी सुनील नेटके (वय 37 रा. नालेगाव, हाडको) व त्यांचा भाचा केसरी चेतन शेलार (वय 3) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोमवारी रात्री कल्याण रोडवरील महालक्ष्मी लॉन येथे एका लग्न समारंभासाठी मिनाक्षी, सुनीता व केसरी दुचाकीवरून गेले होते. लग्न समारंभ उरकल्यानंतर रात्री साडे दहा वाजता ते दुचाकीवरून घराकडे निघाले असता त्यांच्या दुचाकीला ठाणगे पेट्रोलपंपाजवळ एका कारने पाठीमागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील तिघेही जखमी झाले. त्यातील सुनीता आहुजा यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com