
संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner
भरधाव वेगाने जाणार्या कारने मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास तालुक्यातील वडगावपान परिसरातील टोल नाक्याजवळ घडली. अपघातामधील कार ही एका आरोग्य अधिकार्याची असून तो मद्य प्राशन करून गाडी चालवत त्याने एकाचा बळी घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
अमोल गजानन सानप (वय 30, रा. कर्हे, तालुका संगमनेर) हा आपल्या मित्रासोबत मोटारसायकलवरून संगमनेरहून लोणीकडे जात होता. तालुक्यातील वडगावपान परिसरातील टोल नाक्याजवळ त्याच्या मोटारसायकलला एका कारने धडक दिली. सदर कार ही शहरातील एका आरोग्य अधिकार्याची आहे. हा वैद्यकीय अधिकारी मद्य प्राशन करून कार चालवत होता. अपघातानंतर त्याने खाली उतरून वाहनाची ओळख पटू नये यासाठी कारच्या मागील व पुढील नंबर प्लेट काढून घेतल्या. यानंतर तो तेथून पसार झाला. अपघाताची माहिती समजताच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी जमा झाले. अपघातामध्ये मोटारसायकल वरील दोघे जखमी झाले. अमोल सानप याला गंभीर मार लागल्याने त्याला तातडीने उपचारासाठी शहरातील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांनी तालुका पोलिसांना खबर दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 90/2023 सीआरपीसी 174 प्रमाणे नोंद केली आहे. दरम्यान उशिरापर्यंत कारचालक आरोग्य अधिकार्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलानव्हता.