
पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi
तालुक्यातील वाळुंज शिवारात राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (दि.11) रात्री 10.30 च्या सुमारास प्रवासी कार आणि दुचाकी मध्ये झालेल्या भीषण अपघातात पाथर्डी तालुक्यातील अकोले येथील रघुनाथ रंगनाथ पंडित (50) यांचा मृत्यू झाला आहे. तर रणजित बबन पंडित (35) व महेश निवृत्ती पंडित (20, रा.अकोले ता पाथर्डी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अकोला येथील रघुनाथ पंडित, रणजीत पंडित,महेश पंडित हे तिघेजण दुचाकीवरून पाथर्डी येथून त्यांच्या गावी जात होते. त्यावेळी पाथर्डी तालुक्यातील वाळुंज शिवारात भरधाव आलेल्या कार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला.
जखमींना परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलवण्यात आले. मात्र गंभीर जखमी असलेल्या रघुनाथ पंडित याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर रणजित पंडित, महेश पंडित या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.