
संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
आपल्या मुलाला जेवणाचा डबा घेऊन जाणार्या आईचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना संगमनेर तालुक्यातून जाणार्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात काल बुधवारी दुपारी घडली आहे. हिराबाई बाळशिराम दिघे (वय 50 वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या माहुली येथील हिराबाई दिघे या आपल्या मुलाचा डबा घेऊन पायी माहुलीकडून एकोणावीस मैलाच्या दिशेने जात होत्या. तर कार क्रमांक एमएच 12 एम.आर 4320 ही आळेफाट्याकडून संगमनेरच्या दिशेने जात होती.
माहुली शिवारात या कारने हिराबाई दिघे यांना जोराची धडक दिली त्यामुळे त्या जागीच ठार झाल्या. अपघात झाल्याचे समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर डोळासणे महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे पाहावयास मिळत आहे.