अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लघुशंकेसाठी रस्त्याच्याकडेला दुचाकीसह थांबलेल्या तिघांना कारने धडक दिली. या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत.

संजय महादेव बोडखे (रा. केडगाव) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वैभव शरद जाधव (रा. माळीवाडा) आणि गणेश संभाजी ठोंबरे (रा. पाईपलाईन रोड) अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत. सोनेवाडी-केडगाव रोडवरील महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर रविवारी रात्री पावणे आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.

कोतवाली पोलीस ठाण्यात कार (एमएच 12 सीके 2576) चालक भाऊसाहेब दगडू गारूडकर (रा. अकोळनेर ता. नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल शंकर पाटील (रा. कायनेटिक चौक) यांनी फिर्याद दिली आहे. संजय बोडखे, वैभव जाधव आणि गणेश ठोंबरे हे रस्त्याच्या कडेला दुचाकी उभी करून थांबले होते.

फिर्यादी राहुल पाटील हे पाठीमागून येईपर्यंत ते बोलत असतानाच केडगावच्या दिशेने आलेल्या कारने तिघांना धडक दिली. या धडकेत संजय महादेव बोडखे यांचा मृत्यू झाला. तर जाधव आणि ठोंबरे हे जखमी झाले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बाबासाहेब इखे करीत आहे.