आलिशान चारचाकी वाहनातून 28 किलो गांजा जप्त

एलसीबी, तोफखाना पोलिसांची कारवाई; तिघांना अटक
आलिशान चारचाकी वाहनातून 28 किलो गांजा जप्त

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील नगर- मनमाड रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखा व तोफखाना पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत साडेपाच लाख रुपयांचा 28 किलो गांजा एका आलिशान चारचाकी वाहनातून जप्त केला. शनिवारी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास राजपाल मॉलसमोर ही कारवाई करण्यात आली.

मुकेश अरूण नेटके (वय 34 रा. शिवाजीनगर, पाटील इस्टेट, पुणे), जावेद इनायत शेख (वय 21 रा. शांतीनगर पुणे), अजय अरूण जोंजट (वय 26 रा. शिवाजीनगर, पाटील इस्टेट, पुणे) यांना आय 20 कारसह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहायक फौजदार राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार संजय खंडागळे, पोना शंकर चौधरी, पोना रविकिरण सोनटक्के, पोकॉ रोहीत येमुल, पोकॉ सागर ससाणे, पोकॉ आकाश काळे, रवींद्र घुंगासे, चापोहेकॉ बबन बेरड हे गस्त करत असताना उपनिरीक्षक सोपान गोरे यांना मनमाड रस्त्यावरून नगरच्या दिशेने येणार्‍या आय 20 कारमध्ये गांजा असल्याची माहिती मिळाली.

त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना माहिती दिली. त्यानंतर गडकरी यांच्यासह सपोनि जुबेर मुजावर, उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोहेकॉ सुनील शिरसाठ, दत्तात्रय जपे, पोना संदीप धामणे, सुनील भरते व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजपाल मॉलसमोर वाहन तपासणी सुरू केली. संशयित कार (एमएच 12 टीएन 6045) नगरच्या दिशेने येताच पोलिसांनी तपासणी केली. कारची मागील काच फुटलेली व पुढील काच अर्धवट फुटलेल्या अवस्थेत आढळली. कारच्या डिक्कीत प्लॅस्टीक पिशवीत गांजा आढळून आला. पोलिसांनी 5.60 लाख रुपये किंमतीच्या 28 किलो गांजासह आठ लाख रुपये किमतीची आय 20 कार जप्त केली आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक मुजावर करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com