23 किलो गांजासह दोन जणांना अटक

श्रीरामपूर शहर पोलिसांची कारवाई
23 किलो गांजासह दोन जणांना अटक

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील दिघी रोडवर शहर पोलिसांनी 23 किलो गांजाची वाहतूक करत असताना दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 6,81,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांना गुप्त बातमीदाराकडून शिर्डीकडून दिघीमार्गे श्रीरामपूरकडे एका इंडिगो सी.एस. गाडीमध्ये दोन इसम गांजा घेवून येणार आहेत, अशी माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ पथकासह सुतगिरणी रेल्वे फाटक गाठले. दिघीकडे शामलिंग शिंदे यांच्या विटभट्टीजवळून जात असताना त्यांना समोरुन एक पांढर्‍या रंगाची इंडिगो सी.एस. गाड़ी येताना दिसली.

पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी गाडीतून खाली उतरुन समोरून येणार्‍या गाडी (क्र. एम.एच. 44 बी. 9991) ला आवाज देवून थांबण्याचा इशारा केला. सदर इसमाने गाडी थांबवली, तेव्हा पथकाने गाडीजवळ जावून पाहणी केली. तसेच गाडीतील दोन इसमांना त्याचे नाव विचारले असता त्यांनी अस्लम यासीन मन्सुरी (वय 40, धंदा-मजुरी, रा. भैरवनाथनगर), शाहरूख युनुस शेख (वय 29, रा. बर्फ कारखानाच्या पाठीमागे, संजयनगर) असे सांगितले. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये पिवळ्या व आकाशी रंगाच्या दोन गोण्या भरलेल्या मिळुन आल्या. गोण्याचा वास घेतला असता दर्प नशा आणणारा वास येत होता. त्यामुळे सदर गोण्याचे तोंड सोडुन पाहणी केली असता त्यात गांजा असल्याची खात्री झाली.

त्या दोन जणांना ताब्यात असलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरची सुकलेली वनस्पती ही गांजा असून तो विकण्यासाठी चालवला असल्याचे सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी 2,31,300 रुपयाचा 23.130 किलो गांजा, 4,50,000 रुपये किंमतीची पांढर्‍या रंगाची इंडिगो सी.एस.गाडी असा एकूण 6,81,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी वरील दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यामध्ये एन.डी.पी.एस. अ‍ॅक्ट 1985 चे कलम 3 (क), 20 (ब), 2 (क), 22 (क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीस अटक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करत आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com