डाव्या कालव्याचे आवर्तन बंद झाल्याने शेतकरी संतप्त

File Photo
File Photo

आरडगाव |वार्ताहर|Aradgav

शेतकर्‍यांनी ऊस तोडणीचे कारण सांगत पाणी घेणार नाही, अशा भूमिका घेतल्याने मुळा डावा कालव्याचे आर्वतन अचानक बंद करण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आली आहे.

रब्बी हंगामातील पिकांसाठी सोडण्यात आलेल्या मुळा डाव्या कालव्याचे आर्वतन शुक्रवार दि.15 जानेवारीपासून 200 क्युसेसने पाणी कालव्याला सुरू करण्यात आलेले होते. यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते.

यावर्षी ऊस, कांदा, गहू, हरभरा वातावरण पिकांना अनुकूल असल्याने ही पिके जोम धरून आहेत. मुळा पाटबंधारे विभागाने 15 जानेवारी रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील शेतकर्‍यांनी 15 जानेवारी रोजी न सोडता हे आवर्तन यापूर्वी सोडण्यात येण्याच्या मागण्या केल्या होत्या.

शासनाच्या नियमानुसार हे आवर्तन सोडण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी निर्माण झाली. ऊस तोडणीअभावी 50 टक्के ऊस शेतात उभ्या असल्याने शेतकर्‍यांची पाणी घेण्याची इच्छा असून देखील ऊस बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू आहे. पिके पाण्यावर असताना देखील बाहेर काढण्याच्या अडचणीमुळे शेतकर्‍यांना पाणी घेता येत नाही व शेजारील शेतकर्‍यांना देखील घेऊ देत नाही.

त्यामुळे पाटबंधारे खात्याला नाईलाजाने जास्त मुळा डावा कालव्याचे पाणी मुसळवाडी तलावात वळावे लागले. 28 पाणीवापर संस्थांच्या मागणीनुसार पाणी पुरवले जाईल असे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शेतकरी पाणी घेत नाही, असा कांगावा करुन कालवा बंद करण्यात आला. पंरतु मानोरी भागात एकही आऊटलेट सोडला नाही. शेतकर्‍यांची पाण्याची मागणी आहे. परंतु पाणी वापर सोसायट्यांच्या आडमुठे धोरणामुळे ही वेळ आली असून या पाणी वापर सोसायट्या बरखास्त करण्यात याव्यात, हे पाणी पाटंबधारे खात्याकडून देण्यात यावे. आजही शेतकरी पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत. विहिरी, कुपनलिका कोरडया पडल्या असून शेतीला पाण्याची गरज आहे. या भागात आउटलेट बंद असून त्वरीत पाणी सोडून फाटे चालू करावे, शेतकर्‍यांच्या भावनांशी खेळू नये.

- बाळासाहेब पोटे, प्रगतशील शेतकरी मानोरी

15 जानेवारीपासून मुळा डाव्या कालव्यावरील रब्बी हंगाम आर्वतन 200 क्युसेसने पाणी कालव्याला सुरू करण्यात आलेले आहे. तरी 8 दिवसात 25 टक्के शेतकर्‍यांचे भरणे झालेले आहे. तसेच प्रत्यक्ष सर्व पाणीवापर संस्थांचे अध्यक्ष व लाभक्षेत्रातील शेतकरी यांची भेट घेतली असता सर्व लाभधारक शेतकरी यांचे असे म्हणणे आहे, आमच्या उसाची तोडणी झालेली नाही. त्यामुळे आम्हाला आता पाणी नको आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय होऊ नये, हे पाणी मुसळवाडी तलावात सोडावे लागले आहे. तसेच लाभधारक शेतकरी यांच्या मागणीनुसार पाणी वाटप केले जाईल.

- एस.बी.सुरुंकर, शाखा अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग शाखा,मुसळवाडी.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com