कालव्याशेजारील जॉगिंग ट्रॅक बनला दारुडे व लव्हर पॉईंट

नगरपालिका व पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
कालव्याशेजारील जॉगिंग ट्रॅक बनला दारुडे व लव्हर पॉईंट

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले व अबाधित राहावे म्हणून नगरपालिकेने शहरातील प्रवरा डाव्या कालव्याशेजारी जॉगिंग ट्रॅकची निर्मिती केली. या जॉगिंग ट्रॅकवर दररोज हजारो नागरिक फिरण्याचा आनंद घेतात, परंतु दुर्दैवाने वॉर्ड नंबर सातमधील कालव्याशेजारी असलेला जॉगिंग ट्रॅक हा दारुडे व लव्हर पॉईंट बनला आहे. यामुळे या जॉगिंग ट्रॅकवर फिरणार्‍या महिला व नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.

स्व. जयंत ससाणे यांच्या संकल्पनेतून श्रीरामपूर शहरात अनेक ठिकाणी नागरिकांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आले. त्यासाठी नगरपालिका दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. आजमितीला या ट्रेकची देखभाल कुणी करत नाही. फक्त बिले काढली जातात. कालव्याशेजारी असलेल्या जॉगिंग ट्रॅकला नागरिक प्रथम पसंती देतात. दुर्दैवाने जॉगिंग ट्रॅकवर मोटर सायकलींचा वावर वाढला आहे. काही महिला व पुरुष सर्रासपणे अश्लील चाळे करताना दिसतात. तर काही ठिकाणी नागरिकांनी आपला संसारात थाटला आहे. झाडी व गार सावली असल्याने दिवसा अनेक दारू पिणार्‍यांच्या मैफिली रंगतात. संध्याकाळी तर हे ठिकाण म्हणजे दारू पिणार्‍यांसाठी व अश्लील चाळे करणार्‍यांसाठी सुरक्षीत ठिकाण ठरले आहे.

जॉगिंग ट्रॅकवर फिरणार्‍या नागरिकांनी नगरपालिका व पोलिसांकडे या संदर्भात तक्रारी केल्या. परंतु या तक्रारींची कुणीच दखल घेतली नाही. नगरपालिका व पोलिस प्रशासनाने याची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा हा ट्रॅक नागरिकांना फिरण्यासाठी नसून अवैध धंद्यासाठी आरक्षित आहे, असा फलक नगरपालिकेने ठिकाणी लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com