
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
बालसंगोपन योजनेच्या प्रकरणांवर निर्णय घेण्यासाठी अहमदनगर जिल्हा बालकल्याण समितीचे शिबीर शुक्रवारी श्रीरामपुरात पार पडले. या शिबिरामुळे श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे तीनशे बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळणार आहे.
श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य समिती व महाराष्ट्र कोरोना एकल समितीच्या पुढाकाराने पंचायत समिती सभागृहात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अहमदनगर जिल्हा बालकल्याण समितीचे सदस्य प्रवीण मुत्याल, अँड. ज्योत्स्ना कदम यांनी प्रस्तावांची तपासणी करून मंजुरीबाबत निर्णय घेतले. त्यांना जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख, बालसंरक्षण अधिकारी (बाह्य संस्था) सर्जेराव शिरसाठ, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातील सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब साळवे, प्रकाश वाघ, क्षेत्रीय कार्यकर्ता श्रद्धा मुसळे, रूपाली वाव्हळ यांनी मोलाचे सहकार्य केले. मिशन वात्सल्य समितीचे अशासकीय सदस्य व कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे तालुका समन्वयक मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, मनिषा कोकाटे यांनी समितीचे स्वागत केले.
राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने बालसंगोपन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत आई किंवा वडील अथवा दोन्ही पालक गमावलेल्या शून्य ते अठरा वयोगटातील बालकांना दरमहा अकराशे रूपये आर्थिक लाभ दिला जातो. मिशन वात्सल्य समिती गठीत होण्याअगोदरच महाराष्ट्र कोरोना एकल महिला समितीच्या वतीने घरोघर सर्वेक्षण करून अशा बालकांची माहिती संकलित करण्यात आली होती. मिशन वात्सल्य समिती गठीत झाल्यानंतर समितीने बालसंगोपन योजनेचा लाभ पात्र बालकांना मिळवून देण्यासाठी प्राधान्य दिले. ग्रामीण भागात अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिकांनी बालकांचा शोध घेऊन प्रकरणे सादर केली होती.
शिबीर यशस्वीतेसाठी तालुका संरक्षण अधिकारी विकास बागुल, मिशन वात्सल्य समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी आशा लिप्टे, शिक्षक मुकुंद टंकसाळे, आशा व संतोष परदेशी, नगरपालिकेचे पैठणे, अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका आदींनी परिश्रम घेतले.